केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दौऱ्यामुळे खंबाटकी घाट ‘चकाचक’; खड्डे बुजले, घाटाला मिळाला नवा लूक!


 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या साताऱ्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खंबाटकी घाटातील रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली असून, घाटाला नवा लूक मिळाला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ८ : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवारी शिरवळ आणि भुईंज दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खंबाटकी घाटातील रस्ते, महामार्गावरील पट्टे व रोलिंग बॅरिकेड्सची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. घाटात आता एकही खड्डा शिल्लक नसून रस्ता पूर्णपणे चकाचक झाल्याने वाहनचालकांकडून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

दौऱ्याची पार्श्वभूमी आणि NHAI ची तत्परता

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भुईंज येथील ‘किसन वीर सहकारी साखर कारखान्याला’ भेट देणार आहेत. या दौऱ्यासाठी खासदार व मंत्र्यांनी मतदारसंघात बैठका घेऊन कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. या दौऱ्यादरम्यान खंबाटकी घाट रस्ता व महामार्गावर कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे.

एरवी ‘वीकेंड’ला (शनिवार-रविवार) या घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वाहतूक ४ ते ६ तास विस्कळीत होते. मंत्री गडकरींचा दौरा नेमका शनिवारीच असल्याने NHAI ने घाटातील रस्त्याची दुरुस्ती पूर्ण केली आहे. रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्यात आले असून, संपूर्ण डागडुजी झाल्याने या मार्गावरून जाणे आता अत्यंत सोयीचे व सुखकर झाले आहे.

खंबाटकी घाट रस्त्यावर पूर्ण झालेली प्रमुख कामे :

  • रस्त्यावर एका स्तराचे नवीन डांबरीकरण.

  • रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षिततेसाठी पांढरे पट्टे.

  • अपघाताचा धोका टाळण्यासाठी तुटलेले लोखंडी ‘रोलिंग बॅरिकेड्स’ बदलण्यात आले.

  • घाटातील सर्व खड्डे पूर्णपणे बुजविले.

  • संपूर्ण घाट रस्ता स्वच्छ करण्यात आला.

  • सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक किलोमीटरवर ‘रेड मार्किंग’ करण्यात आले.

“मंत्री गडकरीसाहेब, तुम्ही पुन्हा पुन्हा या मार्गाने या. यामुळे घाटातील रखडलेली कामे नेहमी पूर्ण राहतील आणि आम्हा सर्वसामान्यांचा प्रवास असाच सुखकर होईल.”

– संतोष देशमुख (सामाजिक कार्यकर्ते, खंडाळा)


Back to top button
Don`t copy text!