खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला 15 मतदारसंघांत बसू शकतो फटका, राष्ट्रवादी व काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांची घरवापसी शक्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि.२२: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील मतदारसंघांत एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा मतदार आहे. त्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे या क्षेत्रात भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत सुमारे १५ विधानसभा जागांवर फटका बसू शकताे.

एकनाथ खडसे यांचे राज्यात भाजप वाढवण्यात मोठे योगदान आहे. खडसे हे लेवा पाटील (ओबीसी) या सधन शेतकरी जात वर्गातून आलेले बहुजन नेते आहेत. हा समाज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आहे. खडसे यांचे गेली चार दशके या परिसरात काम राहिलेले आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांत राष्ट्रवादीचा अमळनेर मतदारसंघात एकमेव आमदार आहे. खडसे यांचा पाठीराखा राहिलेल्या लेवा पाटील समाजाने राष्ट्रवादीला आजपर्यंत मतदान केलेले नाही, ते चित्र आता पालटू शकते. भाजपला राज्यात इतर मागासवर्गीय समाजाचा (ओबीसी) मोठा पाठिंबा आहे. भाजपही ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारी) यांची पार्टी ओळखली जाते. खडसे यांच्यावर भाजपने अन्याय केल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे. भाजपमध्ये बहुजन नेत्यांना ऐनवेळी बाजूला केले जाते, असे चित्र खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने झाले आहे. विधानसभेत ४० पेक्षा अधिक ओबीसी आमदार आहेत. आगामी काळात खडसे प्रकरणामुळे ओबीसी नेते भाजपकडे वळण्याची शक्यता कमी होईल.

मातब्बर नेत्यांची घरवापसी शक्य :

राष्ट्रवादी व काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेते ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवाईच्या भीतीने अजूनही काठावर आहेत. या नेत्यांचा आत्मविश्वास खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे दुणावणार आहे. परिणामी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची पक्षात घरवापसी होऊ शकते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!