कऱ्हाडच्या पालिका शाळेत ‘आयडियल संगणक लॅब’ सुरू; अत्याधुनिक सुविधा मिळवणारी राज्यातील दुसरी शाळा


 कऱ्हाड पालिकेच्या पीएम शाळा क्रमांक ३ मध्ये शासनाच्या १५ लाख रुपयांच्या निधीतून ‘आयडियल संगणक लॅब’ उभारण्यात आली आहे. अशी अत्याधुनिक सुविधा मिळवणारी ही राज्यातील केवळ दुसरी शाळा ठरली असून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

स्थैर्य, कऱ्हाड (सातारा), दि. १७ : शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने प्रगती करणाऱ्या कऱ्हाड पालिकेच्या ‘पीएम शाळा क्रमांक ३’ ने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. राज्य शासनाच्या १५ लाख रुपयांच्या निधीतून शाळेत नुकतीच अत्याधुनिक ‘आयडियल संगणक लॅब’ उभारण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा मिळालेल्या केवळ दोन शाळांपैकी ही कऱ्हाडची शाळा दुसऱ्या क्रमांकाची ठरली असल्याची महत्त्वपूर्ण माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

या अत्याधुनिक संगणक लॅबचे दिमाखदार उद्घाटन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रतापराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, नगरसेवक विजय यादव, नरेंद्र लिबे, नगरसेविका अनिता पवार, प्रशासन अधिकारी रमेश कांबळे आणि अर्जुन कोळी उपस्थित होते.

‘१५९ वरून विद्यार्थीसंख्या अडीच हजारांवर’

यावेळी बोलताना नगराध्यक्ष यादव म्हणाले की, “शाळा क्रमांक तीनची वाटचाल खरोखरच उल्लेखनीय आहे. एकेकाळी केवळ १५९ विद्यार्थीसंख्या असलेली ही शाळा आज वाढून तब्बल अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची झाली आहे. केंद्राच्या ‘पीएम श्री’ (PM SHRI) योजनेतही या शाळेची निवड झाली असून, १ कोटी ८४ लाखांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. ‘आयडियल संगणक लॅब’साठी केलेल्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून ही १५ लाखांची सुविधा शाळेला उपलब्ध झाली आहे.”

काय आहेत ‘आयडियल संगणक लॅब’ची वैशिष्ट्ये?

विद्यार्थ्यांना आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. या लॅबमध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत:

  • २५ आधुनिक संगणक संच

  • ६५ इंची इंटरॅक्टिव्ह पॅनल (स्मार्ट बोर्ड)

  • अखंडित वीजपुरवठ्यासाठी ऑनलाइन यूपीएस (UPS)

  • उच्च दर्जाचे हेडफोन आणि स्टायलिश पेन

  • डिजिटल लर्निंग साधने आणि अॅडजस्टेबल फर्निचर

  • अभ्यासक्रमाशी संबंधित विशेष शैक्षणिक सॉफ्टवेअर

या सर्व सुविधांमुळे कऱ्हाडच्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे डिजिटल शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकरळा झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!