महिला शेतकरी नोंदणीत कराडचा राज्यात डंका; बँक कर्जासह योजनांमध्ये मिळणार थेट प्राधान्य

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम’ अंतर्गत कराड तालुक्यातील २६,७८२ महिलांची नोंद झाली असून तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

स्थैर्य,सातारा, दि. ०७ ऑक्टोबर : राज्यातील महिलांना शेती क्षेत्रात हक्काची कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी एकट्या कराड तालुक्यातून तब्बल २६ हजार ७८२ महिलांची नोंद ‘शेतकरी महिला’ म्हणून कृषी विभागाकडे झाली असून, यामुळे कराडचे मॉडेल राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे.

सरकारी योजना आणि बँक कर्जात थेट लाभ

नोंदणी झालेल्या महिलांना कृषी विभागाकडून लवकरच अधिकृत शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्रामुळे महिलांना बँक कर्ज, कृषी योजना, शासकीय सबसिडी, विमा आणि अनुदानांमध्ये थेट प्राधान्य मिळणार आहे. कराड तालुक्यातील २२२ गावांमध्ये ३५ कृषी सहाय्यक, कृषी सखी, उप कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ही विशेष मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया

जमिनीची मालकी असलेल्या महिलांसाठी ७/१२ आणि ८-अ उतारा, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी दाखला व पासपोर्ट फोटो आवश्यक आहेत. तर स्वतःच्या नावावर जमीन नसलेल्या परंतु प्रत्यक्ष शेतीत काम करणाऱ्या महिलांसाठी स्वयंघोषणापत्राद्वारे नोंदणीची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वर्षानुवर्षे शेतीत राबणाऱ्या महिलांना अधिकृत हक्क आणि आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळाली आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!