दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२३ । मुंबई । जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या किनाऱ्यावरील अधिवासांच्या उत्पन्नासाठी खारफुटी उपक्रम (मँग्रोव्ह ईनिसेंटिव्ह फॉर शोअर लाईन हॅबीटेंट अँड टंजीबल इन्कम- मिष्टी) योजनेअंतर्गत ठाण्यातील काल्हेर येथे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कांदळवन वृक्षारोपण करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संदेश दिला.
यावेळी सहायक वनसंरक्षक अधिकारी गिरीजा देसाई, भिवंडीचे तहसिलदार अधिक पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, जिल्हा परिषद सदस्य जयराम पाटील, काल्हेरच्या सरपंच रुपाली पाटील व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथील स्थानिकांच्या उपजिविकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या कांदळवनांच्या संरक्षण आणि संवर्धनाला केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. देशातील एकूण 75 स्थळांवर व त्यातील महाराष्ट्रातील पंधरा ठिकाणी कांदळवन रोपण केले जाणार असून त्याची सुरुवात आज करण्यात आली. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील काल्हेर आणि वडूनवघर क्षेत्रावर हे रोपण करण्यात येत असून श्री. पाटील यांच्या हस्ते काल्हेर येथील कार्यक्रमात सुरूवात करण्यात आली. या योजनेमुळे कांदळवनांचे पुनर्संचयन होवून स्थानिकांना नवीन उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील तसेच निसर्ग पर्यटनाला चालना मिळणार आहे.
यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, पर्यावरण रक्षणासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असून पर्यावरणावर होणारे अत्याचार करणे थांबवले पाहिजे. पर्यावरणांचे रक्षण करणे हे मानवी जीवन सुखकारक करण्यासाठी आहे. भिवंडी तालुक्यात 550 हेक्टरवर राखीव वन घोषित झाले आहे. आपल्याला शुध्द हवा मिळावी म्हणून हा उपक्रम येथे राबविण्यात येत आहे. पर्यावरणाचे संतुलन रोखण्यासाठी खारफुटी कार्यक्रम हाती घेतलेला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणे या परिसरातील लोकांसाठी गरजेचे झाले आहे. आता सिमेंटची जंगले झाल्याने वातावरणावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी संपूर्ण काल्हेर गावाची वीज सौरऊर्जावर करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदूश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व नागरिकांना कांदळवन संरक्षणासाठी आवाहन केले.