स्थैर्य, पुणे, दि.४: जम्बो कोविड रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची घटना ताजी असतानाच आता असाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ६ दिवसांपूर्वी उद्घाटन झालेले बाणेर येथील ३१४ बेडचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर अद्यापही सुरू झाले नसल्याचे उघडकीस आले आहे.
मोठा गाजावाजा करत २८ ऑगस्टला या डेडिकेटेड कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. हे रुग्णालय दोन दिवसांत सुरू होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. आतापर्यंतचे हे पुण्यातील सर्वोत्तम रुग्णालय असल्याचे प्रशस्तिपत्रही पवारांनी दिले होते. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केली असता त्यांनी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले. तसेच उद्यापासून डॉक्टर उपलब्ध होतील व नंतर हे रुग्णालय सुरू करण्यात येईल, अशी सारवासारव केली. या सेंटरमध्ये अनेक त्रुटी असून ते केवळ पांढरे हत्ती ठरत असल्याचे एक पत्र मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी गुरुवारी काढले, त्यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार समाेर आला आहे.
असे आहे रुग्णालय..
पुण्याच्या बाणेर-बालेवाडी परिसरात सीएसआरच्या माध्यमातून पंचशील ग्रुपच्या मदतीने हे सहामजली कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये २७० ऑक्सिजन, ४४ व्हेंटिलेटर बेड्स असे एकूण ३१४ बेड्स आहेत. ऑक्सिजनची कमी पडू नये म्हणून १३ हजार लिटर क्षमतेचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक आहे. तसेच बॅकअपसाठी १६ बाय १६ ऑक्सिजन सिलिंडर आहे.
मृत घोषित केलेला रुग्ण निघाला जिवंत
काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काेट्यवधी रुपये खर्च करून तब्बल ८०० बेडच्या जम्बाे काेविड रुग्णालयाची उभारणी पुण्यातील शिवाजीनगर येथे करण्यात आली. मात्र, या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असण्यासाेबतच भाेंगळ कारभार सुरू असल्याचे अनेक किस्से समाेर येऊ लागले आहेत. वानवडी येथील ताहेर उस्मान अली (४५) यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते मध्यरात्रीच मृत झाल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले. कुटुंबीयांनी त्यांच्या दफनविधीची तयारी सुरू केली व थाेड्याच वेळात प्रत्यक्ष रुग्णाने कुटुंबीयांना फाेन करून रुग्णालयात माझे हाल हाेत असून मला दुसरीकडे हलवा असे सांगितले. त्यानंतर प्रशासनाचा गलथान कारभार समाेर आला.
वानवडी भागात राहणारे ताहेर अली यांना बरे वाटत नसल्याने सुरुवातीला वानवडीतील सना हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची काेराेनाची चाचणी पाॅझिटिव्ह आली. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जम्बाे काेविड रुग्णालयात शनिवारी रात्री दाखल करण्यात आले. त्याच दिवशी मध्यरात्री दीड वाजता रुग्णाने पत्नीस फाेन करून मला त्रास हाेत असून रुग्णालयात पुरेसा आॅक्सिजन दिला जात नाही व जेवणाचे हाल हाेत असल्याचे सांगितले. रविवारी सकाळीच कुटुंबीय रुग्णालयात गेले असता त्यांना तेथील स्टाफने तुमच्या रुग्णाचा मध्यरात्री तीन वाजता मृत्यू झाल्याचे सांगितल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. रात्रीच दाखल केलेला रुग्ण कसा दगावला, अशी विचारणा कुटुंबीयांनी केली. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी सांगितले.
दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी : महापाैर
अपुरी यंत्रणा उपलब्ध झाली असतानाही राज्यकर्त्यांना चुकीची आणि अर्धवट माहिती दिल्याने उद्घाटनाची घाई झाली. पुरेशी तयारी नसताना राज्य शासनाने उद्घाटन करणे चुकीचे हाेते. या प्रकरणात जे अधिकारी दाेषी आहेत, त्यांच्यावर कारवाई हाेण्याची गरज असल्याचे मत पुण्याचे महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी व्यक्त केले आहे.