
स्थैर्य, फलटण, दि. २६ : माजी केंद्रीय कृषी मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली देशभर कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किसान मोर्चाने आज शुक्रवार दि.२६ मार्च रोजी आयोजित “भारत बंद” मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी तसे आवाहन केले आहे. महाराष्ट्र विधान परिषदचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणचे आमदार दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघात भारत बंद यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले आहे.
केंद्रातील भाजपच्या सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतलेले आहेत. इंधन व गॅस सिलेंडरच्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत. या सर्व बाबींना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने शुक्रवार, दि.२६ मार्चच्या भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
संयुक्त किसान मोर्चा या बॅनर खाली देशातील ५०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले काळे कायदे रद्द करणेबाबत आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत या आंदोलनात ३०० हुन अधिक शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत.