स्थैर्य, फलटण, दि.७ : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. दर दिवशी त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पाण्याचे फवारे, अश्रुधूर, कडाक्याची थंडी या सर्व अडचणींवर मात करत लाखो शेतकरी दिल्लीच्या सिमेवर धडकले आहेत. केंद्र सरकारकडून शेतकर्यांना अद्याप दिलासा मिळत नसल्याने उद्या मंगळवार, दिनांक 8 डिसेंबर रोजी आंदोलक शेतकर्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांचा निर्धार पक्का आहे. अशा कठीण परिस्थितीत आपण सर्वांनी शेतकर्यांना साथ देणे गरजेचे आहे. या भावनेतून शेतकर्यांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी फलटणकरांनी उद्याच्या भारत बंद मध्ये सामील होवून फलटण बंद ठेवण्याचे आवाहन, महाविकास आघाडी मधील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्षांच्या वतीने संयुक्त रित्या करण्यात आलेले आहे.
लोकशाहीत लोकसभा हे सर्वोच्च व्यासपीठ आहे जेथे भिन्न विचारांचे प्रतिनिधित्व करणारे घटक असतात. प्रत्येकाजवळ एक विचार असतो. या सर्व विचारांना वाट मोकळी करून देवून चर्चेअंती निर्णय घेतले जायला हवेत पण हे सरकार त्यांच्याकडे असलेले अंकगणिती बहुमत वापरून या भिन्न विचारांची मुस्कटदाबी करत आपला विचार लादू पाहत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर समग्र कामगार चळवळीने 8 डिसेंबरच्या भारत बंदला फलटणकरांचा पाठिंबा जाहीर असुन याच पार्श्वभूमीवर उद्या 8 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता फलटण येथील श्री मुधोजी मनमोहन राजवाड्यापासून फलटण बंद ठेवण्यासाठी फलटण शहरामध्ये फेरी निघणार आहे.
तरी शहरासह फलटण तालुक्यातील शेतकर्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, शिवसेना व मित्र पक्षांच्या सर्व पदाधिकार्यांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेले आहे.