
स्थैर्य, खटाव, दि.१७: उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या पारगांव ता खटाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रदादा पवार यांना २०१७ साली जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत चालत्या गाडीतून बाहेर उडी मारण्याची वेळ आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद संभाळणाऱ्या दादांनी तालुक्यात इच्छुक उमेदवारांना तिकीट वाटले मात्र स्वतःच्या पुसेसावळी जिल्हा परिषद गटात पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जागेवर तालुकाध्यक्षाच्या पत्नीला तिकीट नाकारुन जितेंद्र दादांना घरचा आहेर दिला. दोन्ही ठिकाणी तिकीट नाकारल्या मुळे नाराज झालेल्या तालुकाध्यानीच बंडखोरीचे निशाण हाती घेत जिल्हा परिषद गटात घड्याळाची टिकटिक थांबवण्याची प्रतिज्ञा केली. अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला असला तरी अपक्ष उमेदवारी करून तब्बल सहा हजार मते मिळवली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर नाराज असलेल्या दादांना भाजपने गळाला लावले. सहकारमंत्री चंद्रकांत दादांनी शब्द देऊनही पाळला नाही. मात्र पैलवान दादांनी विधानसभा निवडणुकीत कमळाच्या पाकळ्या मजबूत करण्यासाठी भाजपला साथ दिली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या धर्मनिरपेक्ष पक्षात वावरलेल्या दादांची भाजपमध्ये चांगलीच घुसमट झाली.
जानेवारी महिन्यात हरणाई सुत गिरणीवर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खटाव तालुक्यात आणि कराड उत्तर मतदारसंघात चर्चा सुरू होती. पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी देखील राज्याचा कारभार करताना मतदारसंघ मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे. मधल्या काळात त्यांच्या पासून दुरावलेले एकएक मोहरे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत आणून राष्ट्रवादी मजबूत करण्यावर भर दिला आहे.आज अखेर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत जितेंद्रदादांनी पुन्हा हातात घड्याळ बांधून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.