स्थैर्य, फलटण, दि. ३: शिवसंदेशकार, माजी आमदार, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांचा दि. 3 सप्टेंबर हा स्मृतीदिन त्यांना जावून 20 वर्षे लोटली परंतू त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही असे ते अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांची आठवण येताच सारा इतिहास नजरेसमोर येतो.
माझे लग्न सन 1991 मध्ये झाले आणि भाऊंचे निधन सन 2000 साली झाले अवघा 9 वर्षाचा त्यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले नातवंडासाठी भाऊ आणखी 20 वर्षे हवे होते निश्चित नातवंडावर झालेले त्यांचे प्रत्यक्ष संस्कार आम्हा कुटुंबियांसाठीच नव्हे फलटणकरांसाठीही उपयुक्त ठरले असते.
एकदा काय झाले भाऊ निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते सुमारे 15 दिवसाहून अधिक काळ रुग्णालयात दाखल असताना माझे मोठे दीर राजेश दत्तात्रय निंबाळकर यांच्या घरातून भाऊंना रुग्णालयात नाश्ता, जेवण जात असे परंतू मी आणि माझी मोठी मुलगी सई (तेंव्हा ती तीसरीत होती) आणि तीचे पप्पा पुरुषोत्तम तथा राजाभाऊ निंबाळकर आम्ही हॉस्पिटलमध्ये जावून भाऊंची भेट घेत असू त्यांना काय हवे नको याची चौकशी करीत असू एकदा सई व तीचे पप्पा हॉस्पिटलमध्ये भाऊंना भेटण्यास गेले भाऊंनी सईचा हात धरुन ठेवला आणि मला घरी घेवून चला तोपर्यंत मी सईला सोडणार नाही भाऊंनी त्यावेळी अक्षरश: गोंधळच घातला नाविलाजाने सईचे पप्पा एकटेच घरी आले.
माझ्या सासूबाई त्याही आजारीच होत्या घरातच कॉटवर पडून असायच्या त्यांनी घरात गोंधळ घातला सई कुठे आहे, तीला घेवून ये म्हणून त्यांनी आकांड तांडव केले. एवढे प्रेम आजी आजोबांनी माझ्या मुलांना दिले. जेंव्हा दुपारनंतर भाऊंना घरी आणले तेंव्हाच दोघेही शांत झाले. त्यांनी आपल्या बरोबरच सईला घरी आणले. आजीआजोबांनी माझ्या लहान मुलांना सोडून कधी एक घास खाल्ला नाही.
स्व. भाऊंच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळाले वाईट एवढेच वाटते की त्यांचे जाहीर सभेतील घणाघाती भाषण मला ऐकावयास मिळोल नाही. त्यांची सहनशक्ती जबरदस्त होती. नेहमी शांत असायचे त्यांनी स्वत:साठी काहीच केले नाही किंवा साठवून ठेवले नाही. गरजू लोकांसाठी मात्र त्यांनी खूप केले. राजकारणापेक्षा किंवा त्यातुन येणार्या सत्तेपेक्षा सामाजिक परिवर्तनासाठी गुलामगिरीविरुध्द लढण्यात ते नेहमीच आग्रभागी राहीले.
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, कामगार क्षेत्रातील दिपस्तंभ म्हणून माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांचेकडे आदराने पाहिले जात असे ते एक झंझावाती, वादळी व्यक्तीमत्व होते. स्वातंत्र्य लढ्यातील दिपस्तंभ क्रांतसिंह नाना पाटील, आचार्य प्र.के. आत्रे यांचे बरोबर विविध चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले.
दैदिप्यमान व गौरवशाली महाराष्ट्रातील सामाजिक, राजकिय, ऐतिहासिक, वृत्तपत्र क्षेत्रातील परंपरांचा वारसा जतन करुन आयुष्यातील सार्वजनिक जीवनाच्या प्रवासात सामाजिक, राजकिय, वृत्तपत्रिय क्षेत्रातील आपल्या कार्यकर्तृत्वाचा वैशिष्ठ्यपूर्ण ठसा उमटविणारे फलटण तालुक्यातील कामगार, खंडकरी शेतकरी, पोलीस पाटील, पत्रकार याक्षेत्रातील प्रश्नांसाठी विधानसभेच्या माध्यमातून, कामगार संघटनांच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सतत संघर्ष केला. गोवामुक्ती संग्रामात किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान विसरता येणार नाही.
सर्वांना परिचित असलेले स्व. हरिभाऊ निंबाळकर हे खरे म्हणजे हाडाचे राजकारणी आणि तेही डाव्या विचार सरणीचे खुर्चीचा, कमिटीचा, महामंडळाचा मोह त्यांना कधीच झाला नाही राजकारणापेक्षा किंवा सत्तेपेक्षा सामाजिक परिवर्तनासाठी वृत्तपत्रच प्रभावी काम करु शकेल या जाणीवेने त्यांनी वृत्तपत्राच्या क्षेत्रात साप्ताहिक, पाक्षिक आणि दैनिक या माध्यमातून मोठे काम केले.
सन 1957 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जावून त्यांनी नवा इतिहास घडविला या निवडणूकीत त्यांनी फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या विरोधात निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. अर्थात त्यावेळची पार्श्वभूमी ही 1957 च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची होती त्यामुळे तो पराभव श्रीमंत राजेसाहेबांचा नव्हता तर तो चळवळीचा विजय होता आणि म्हणूनच स्व. कॉ. हरिभाऊ निंबाळकर आणि श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांचे संबंध अखेरपर्यंत जिव्हाळ्याचे राहिले.
कोणत्याही राजकिय सत्तेमध्ये नसताना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम निश्चित प्रेरणादायी आहे. सामान्य पत्रकारांना शासनाच्या विविध सोई सवलती मिळाल्या पाहिजेत यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले ग्रामीण भागातील पत्रकारांना मुंबईमध्ये किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम स्व. हरिभाऊ निंबाळकर यांनी केले.
दै. शिवसंदेशच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना, शेतकर्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. शेतकर्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या विरुध्द मोठा संघर्ष उभा केला.
लायन्स इंटरनॅशनल या अंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या येथील शाखेच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील श्रीमंत मंडळींना समाजासाठी सेवावृत्तीने काम करण्याची नवी उमेद त्यांनी निर्माण केली. गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी लायन्स क्लबच्या माध्यमातून या मंडळींना त्यांनी प्रोत्साहित केले. राज्यातील जकात कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस पाटील वगैरे क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला आणि या लोकांना न्याय मिळवून दिला.
सन 1832 मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरु केले त्या दर्पण पासून शिवसंदेशपर्यंतचा महाराष्ट्रातील पत्रकारितेचा इतिहास सर्वांना अभिमान वाटावा असाच आहे. दि. 25 जून 1995 रोजी स्व. भाऊंना प्रख्यात कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण म्हणावा लागेल.
आज समाजातील सारी कार्यशक्ती, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा याच्या मागे लागली आहे त्यांना गोरगरीब परिस्थितीने हतबल झालेल्यांबद्दल काही देण घेण नसत आज आपली भाकरी भाजतेय ना मग बास झाल अशी भावना निर्माण झाली आहे.
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या फलटण नगरीच्या मातीने ज्यांना घडविले, वाढविले अशा कर्तृत्ववान माणसाच्या जाण्याने शोषीत, उपेक्षित समाजाची आणि माझ्या कुटुंबाची फार मोठी हानी झाली आहे.
स्व. कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन.
– श्रीमती लता पुरुषोत्तम निंबाळकर
मोबाईल : 7083334071