स्थैर्य, लोणंद , दि. १५: संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा देवाचा नवरात्र व दसरा उत्सव यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्त कमिटीने घेतला आहे. इतिहासात पहिल्यांदाच जेजुरीचा “मर्दानी दसरा” उत्सव रद्द करावा लागला आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीचा दसरा हा “मर्दानी दसरा” म्हणून ओळखला जातो. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उत्सव साजरे करण्यास मज्जाव केला असल्याने जेजुरीच्या श्री. मार्तंड देवस्थानाने होऊ घातलेल्या नवरात्र व दसरा हा ऊत्सव साध्या पद्धतीने नित्योपचार व परंपरा राखत साजरा करण्याचा निर्णय घेतला असुन इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदिप जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा मंदिरात यंदाचा नवरात्र व दसरा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
साधेपणाने व परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे. मात्र, श्रींचा पालखी सोहळा, खंडा स्पर्धा (खंडोबाची अज्रस्स ४२ किलोची तलवार एका हाताने उचलण्याची स्पर्धा,) राज्यातून येणारे कलावंत व वाघ्या मुरळी यांची हजेरी, दसऱ्या निमित्त मानपान – रोख मानधन, भजन, पूजन, प्रसाद वाटप आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अशीही माहिती देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा- सात महिन्यांपासून मंदिर बंद आहे. तसेच नवरात्रोत्सवातही ते बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन मंदिर विश्वस्त कमिटीतर्फे करण्यात आले
आहे. दरम्यान मंदिरातील पुजारी, नित्य वारकरी, सेवेकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत दैनंदिन पूजा व
नवरात्र उत्सवातील पूजा अर्चा होणार असल्याचे नमूद केले आहे.
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचं तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पध्दतीने मर्दानी दसरा साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षापासून इथं असलेल्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणं फिटतं. येळकोट येळकोटचा गजर… पिवळ्या धमक भंडाऱ्याची उधळण… सनई चौघडे, भक्तीगीतं आणि अंगात सळसळता उत्साह आणणारी तलवारबाजी. साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा खंडेरायाच्या नवसाला भाविक मोठी गर्दी करतात . नवसाला पावणारा खंडेराया या श्रद्धेनं भाविक सणासुदीच्या दिवसात जेजुरीला आवर्जून हजेरी लावतात… मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच या उत्सवावर मर्यादा आली आहे.