दैनिक स्थैर्य | दि. २७ मार्च २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे प्रतिवर्षीप्रमाणे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळा भक्तीभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
गोखळी येथील बाजार मैदानावरील पटांगणात टाळमृदंग, वीणा आणि विठू नामाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. परिसर, रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. ह.भ.प. गोविंद गावडे यांनी गाथा पारायण वाचन केले. सकाळी १० ते १२ या वेळेत वैष्णव बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था अकोलेचे संस्थापक, ह.भ.प. रामाणाचार्य वैष्णवीताई धायगुडे यांचे सुश्राव्य किर्तन झाले. नांदुरकीच्या वृक्षाला फुलांनी सजावट केली होती. २४ व्या बीजोत्सव उत्सवानिमित्त भजन, किर्तन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, हनुमान माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि भाविकांनी लाभ घेतला. गोखळीबरोबरच मुंजवडी, गुणवरे, निंबळक, आसू, साठे, सरडे आदी परिसरात प्रतिवर्षीप्रमाणे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला.