दैनिक स्थैर्य | दि. २७ मार्च २०२४ | फलटण |
काळज बडेखान (ता. फलटण) येथील एका १४ वर्षांच्या मुलीला अपहरण करून नेल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्याकडे देण्यात आला होता.
वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुशील भोसले यांनी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास केला असता पीडित मुलगी ही बिहार राज्यात आरोपी गणेश माणिक अवघडे (रा. गोंदवले, ता. माण, सध्या रा. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यासोबत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथक तयार करून हे पथक बिहार राज्यात पाठविले. त्यानुसार या पथकाने दि. २४ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजता आरोपी गणेश माणिक अवघडे याला पीडित मुलीसह ताब्यात घेऊन लोणंद पोलीस ठाण्यात आणली व तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या ताब्यात दिली.
या कारवाईत लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पो.ह. सर्जेराव सूळ, पो.कॉ. केतन लाळगे, म.पो.कॉ. ऋतुजा शिंदे, पो.कॉ. सुनील नामदास यांनी भाग घेतला.