स्थैर्य, फलटण, दि.१०: नैऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या मध्य भागात अधिक सक्रीय झाला असून त्याने महाराष्ट्रातील अनेक भाग व्यापण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन – तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात पाऊस बरसत आहे. आपल्या फलटण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनचे वेळेवर होणारे आगमन दिलासादायक असल्याने त्याचे स्वागत तर आनंदाने करायलाच हवे; मात्र त्याचबरोबर पावसाळ्यासोबत येणार्या विविध आजारांबाबत दक्ष राहून योग्य ती खबरदारी घेणेही क्रमप्राप्त आहे.
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून आपण आरोग्यविषयक संकटाशी सामना करत आहोत. अशातच आता पुढच्या चार महिन्यांसाठी पावसाळा सुरु होत आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणारे पाणी, त्यात होणारे डास, माशा, दुषित पाणी यांमुळे साथीचे आजार फैलावण्याची शक्यता असते. कधी नुसत्या ताप आणि सर्दीवर निभावते अन्यथा संसर्गजन्य आजारही होतात. मलेरिया, चिकनगुनिया, डेंगू आदी आजार दिर्घकाळ सुरु राहतात तसेच त्यावर योग्य ते उपचार घेणेही आवश्यक असते.
वास्तविक पाहता पावसाळ्यात होणारे हे आजार आता आपल्याला नवीन नाहीत. पण कोरोनाची पार्श्वभूमी या आजारांविषयी काळजीत टाकणारी आहे. कारण पावसाळ्यात होणार्या आजारांची लक्षणे आणि कोरोनाची लक्षणे ही बहुतांशप्रमाणात सारखीच आहेत. त्यामुळे लक्षणे सारखी असल्याने रुग्ण ओळखणे कठीण जाऊ शकते. ज्याप्रमाणे कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रामुख्याने ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे असतात, त्याचप्रमाणे सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढून अशी लक्षणे असणार्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दमा आणि कोरड्या खोकल्याचे रुग्ण कोरोना संशयित असल्याने, ते वेळीच लक्षात न आल्यास व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येण्याचा धोका वाढू शकतो. पावसाळ्यातील वातावरण बदलामुळे ताप-थंडी, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढतात, तर कोरोनाचेही या लक्षणांशी साधर्म्य आहे. त्यामुळे रुग्णालयात व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांप्रमाणेच कोरोना संशयित रुग्णही येण्याची शक्यता आहे. अशा वेळी रुग्णालयांमध्ये येणार्या रुग्णास कोरडा खोकला, ताप आणि सर्दी नसताना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास अशा रुग्णांची स्वतंत्र कक्षात तपासणी करणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा नव्याने वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेला हे आव्हानच राहणार आहे. शिवाय लक्षणे साधर्म्यामुळे कोरोना चाचण्यांमध्ये वाढ झाली तर आता पुन्हा सध्या सुरु असलेला चाचण्यांच्या अहवालाबाबतचा घोळ होऊ नये हे देखील अपेक्षित आहे.
पहिल्या दोन – चार पावसातच आरोग्य विषयक या समस्यांची सुरुवात राज्यातील काही जिल्ह्यात एव्हाना सुरुही झाली आहे. सातारा जिल्ह्यातही सांधेदुखी, ताप, थंडी, थकवा अशा लक्षणाने अनेक जण आजारी पडून डेंग्यू, मलेरियाचे निदान होत आहे. आरोग्य विषयक ही धोक्याची पाऊले ओळखून फलटण पालिकेच्या स्वच्छता विभागाने तात्काळ उपाययोजना राबवल्या तर या आजारांचा थैमान वेळीच रोखण्यात यश येईल. सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेला प्राधान्य देवून कचराकुंड्या, उघडी गटारे यांची दैनंदिन स्वच्छता ठेवली पाहिजे. नागरिकांच्यातही या विषयक जनजागृती करुन त्यांना डासांचा फैलाव रोखण्यासाठी आपल्या घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे किवा बुजवणे, घराच्या खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसविणे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून घासून, पुसून, स्वच्छ करून कोरडा दिवस पाळणे, टायर, फुटके कॅन, डबे यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, संडासच्या व्हेंट पाइपला जाळी बसविणे, कायस्वरूपी डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडणे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे यासाठी आत्तापासूनच प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या आकडेवारीनुसार ‘लॉकडाऊन’ उठवून ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु झालेली आहे. याला आपण बिघडलेली घडी सावरण्याचा काळही म्हणू शकतो. पण या काळात जोडीला पावसाळा असल्याने सावरण्याच्या काळात आपण आजारी पडणार नाही याची विशेष दक्षता प्रत्येक नागरिकाने घेणे गरजेचे आहे. दुसर्या लाटेत आपण बरेच काही गमावले आहे आणि आता कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबतही अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे इथून पुढेही शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन सोशल डिस्टंन्सींग बरोबरच मास्क, सॅनिटायझर यांचा वापर कटाक्षाने करणे आवश्यक आहे. योग्य त्या खबरदारीने स्वत:बरोबरच आपल्या कुटूंबाला आजारांपासून दूर ठेवून आरोग्यदायी पावसाळा आपण व्यतीत करु शकतो.
शेवटचा मुद्दा :
फलटण शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे पावसाळ्यात तुंबलेल्या आणि खड्डेयुक्त रस्त्यांचा सामना फलटणकरांना करावा लागणार आहे. खोदकामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाल्याने मोठा पाऊस झाल्यास हे रस्ते पावसात बुडून जाण्याची परिस्थिती आहे. भुयारी गटाराची जोडणी झालेल्या गल्ली-बोळातील रस्ते पावसाळ्याआधी पूर्ववत होणे आवश्यक होते. पण तसे शक्य न झाल्याने या खाचखळग्यांच्या रस्त्यातून ये – जा करताना अपघाताची शक्यता असल्याने नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
रोहित वाकडे, संपादक, सा.लोकजागर, फलटण.