दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | फलटण | आयोडिनच्या कमतरतेमुळे उदभवणारे विविध आजार हे सार्वजनिक आरोग्यासमोर असलेली गंभीर समस्या आहे. आपली मुलं ही आपल्या देशाची गुंतवणूक आहेत, म्हणूनच त्यांना “देशाची संपत्ती” असे संबोधल्या जाते. म्हणून मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांपासून स्वत:ला तसेच आपल्या मुलांना वाचविने ही काळाची गरज आहे.
सध्या जगात 1.5 बिलीयन पेक्षा अधिक लोक आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आजाराने ग्रासले आहेत. तर 200 मिलियन पेक्षा अधिक भारतीय लोक आयोडिनच्या कमतरतेमुळे उदभवणाऱ्या धोक्यांना सामोरे जात आहेत. तर 71 मिलियन लोक गलगंड आणि इतर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे भारत सरकारने केंद्र सहाय्यीत राष्ट्रिय गलगंड नियंत्रण कार्यक्रम सुरु केला. या माध्यमातून भारतातील सर्व भागातील लोकांना वेगवेगळया माध्यमांव्दारे “आयोडिन युक्त मीठ” रोजच्या आहारातून घेण्यास आरोग्य शिक्षण दिले जात आहे.
“आयोडिन” हे महत्वपूर्ण खनिज द्रव्यांपैकी एक खनिज असून शरीरातील साधारण थॉयरॉईड ग्रंथींचे कार्य, वाढ आणि विकास होण्यास अत्यंत आवश्यक घटक आहे. आहारातील आयोडिन शरीराच्या भैतिक तसेच मानसिक विकासासाठी आवश्यक असते. आयोडिनची 90 टक्के गरज अन्नातून आणि 10 टक्के आयोडिन पाण्यातून मिळते. समुद्राच्या 1 लिटर पाण्यात 0.05 मि.ग्रॅम (0.05 पी.पी.एम.) आयोडिन असते. समुद्रापासून तयार होणाऱ्या मीठात फक्त 0.28 पी.पी.एम. आयोडिन असते. म्हणून मीठाच्या आयोडीनीकरणासाठी साध्या मिठात पोटॅशिअम आयोडेट वापरले जाते. हे पूर्णपणे सुरक्षित आहे.
रोजच्या आहारात आयोडिनयुक्त मीठ वापरणे कां आवश्यक आहे?
आपल्या गळयामध्ये वरच्या भागात थॉयरॉइड ग्रंथी असते. ही ग्रंथी आयोडिनचा उपयोग करुन थायरॉक्झीन (टी-4) आणि ट्राय-आयडोथायरॉक्झीन (टी-3) नावाचे हार्मोन्स तयार करते. शारीरिक तसेच मानसिक विकासासाठी या होर्मोन्सची आवश्यकता असते.
थॉयरॉक्झीन कमी पडल्यास व्यक्ती निरुत्साळी बनते. लवकर थकवा येतो. त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारे विविध आजार म्हणजेच- गलगंड, मानसिक दुर्बलता, मुकेपणा, बहिरेपणा, तिरळेपणा, उभे राहण्याची आणि चालण्याची क्षमता कमी होणे, अवयवांची वाढ खुंटणे इ. विकार संभवतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये आयोडिनच्या कमतरतेची समस्या अधिक आढळते. पौंगंडावस्थेत आणि पुरुत्पादनक्षम वयात त्याची तीव्रता अधिकअसते. गर्भपात, उपजत मत्यू, जन्मात दोष्, अर्भक मत्यू मधील वाढ, मतिमंदपणा, तिरळेपणा, खुजेपणा, मनोव्यापारातील दौर्बल्य, नवजात हायपोथॉयराडिझम, बाल्यावस्थेतील हायपोथायराडिझम इत्यादी आजार उदभवतात. याशिवाय आयोडिनच्या कमतरतेमुळे “क्रेटिनिझम” हा आजार होतो. गर्भपणाच्या काळात मातेला आयोडीनची कमतरता असल्यास अर्भकाच्या शारीरिक आणि मेंदूच्या वाढीवर दुष्परिणाम होवून कायमचे अपंग येऊ शकते. अशी मुले जन्माला आल्यानंतर सर्वसाधारण मुलांप्रमाणे चालू किंवा बोलू शकत नाहीत. म्हणूनच आयोडिनयुक्त मीठाला अनन्य साधारण महत्च आहे. प्रौढ व्यक्तिला दररोज साधारणत: 150 मायक्रोग्रॅम इतके आयोडीन लागते. गर्भवती आणि स्तनदा मातांना मात्र 200 मायक्रोग्रॅम इतके आयोडिन आवश्यक असते.
खाण्याच्या मीठाचे आयोडिकरण हा आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध करण्याचा साधा सोपा परिणामकारक उपाय आहे. सर्वसाधारणपणे आपण दररोज 10 ग्रॅम मीठ खात असतो. आपण 15 पी.पी.एम. एवढे आयोडिन असणाऱ्या आयोडिनयुक्त मीठाचे सेवन केल्यास आपली दैनंदिन आयोडिनची गरज पूर्ण होऊ शकते.
अन्न पदार्थांमध्ये विविध पोषक घटक असतात त्याप्रमाणे आयोडिन नसते काय?
विशेषकरुन समुद्री अन्नपदार्थांमध्ये आयोडिनचे प्रमाण भरपूर असते. परंतु डोंगराळ आणि पुरग्रस्त भाग या ठिकाणी जमिनीमध्ये व पाण्यामध्ये आयोडिनचे प्रमाण फारच कमी असते आणि साहजिकच त्याठिकाणी पिकणाऱ्या पिकांमध्ये सुध्दा आयोडिनचे प्रमाण कमीच राहते. उत्तर-पुर्व भारतात अधिकाधिक डोंगराळ भाग असल्यामुळे त्या भागात खूजेपणाचे लक्षण जास्त प्रमाणात आढळून येतात.
तसेच महाराष्ट्राबाबत सांगायचे झाल्यास औरंगाबाद, जालना, वर्धा, अमरावती, बुलढाणा, सातारा, ठाणे, लातूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्हयांमध्ये आयोडिनच्या कमतरतेचे रोगी जास्त प्रमाणात आढळून आलेले आहेत. इतर जिल्हयांमध्ये सुध्दा या रोगांकरिता सर्वेक्षण झाले असून कमी अधिक प्रमाणात आढळून आलेले आहेत. म्हणूनच आयोडिनच्या कमतरतेने होणाऱ्या विकारांच्या प्रतिबंधाकरिता आपल्या रोजच्या समतोल आहाराचा घटक म्हणून आयोडिनयुक्त मीठाचा वापर करावा.
आयोडिनयुक्त मीठ हे रोजच्या वापरात खूपच कमी लागते. जसे 10 ग्रॅम मीठ या अंदाजाने प्रत्येक माणसाला महिण्यासाठी 300 ग्रॅम आणि 5 जणांच्या कुटुंबाला 1.5 कोलोग्रॅम एवढे मीठ लागते. आयोडिन न्यूनता विकार यापासून बचाव हा मोठा फायदा घेण्यासाठी कुटूंबाला खुपच छोटी किंमत मोजावी लागते.
आयोडिनची कमतरता नसतांना आपण आयोडिनयुक्त मीठ घेतल्याने आपल्याला अपाय होणार नाही. शरीराला आवश्यक असेल एवढेच आयोडिन वापरले जाते आणि बाकीचे आयोडिन लघवी वाटे बाहेर टाकल्या जाते. आयोडीनयुक्त मीठाचे कोणतेही विपरित परिणाम होत नाहीत. हे आरोग्य शिक्षणाव्दारे लोकांना पटवून दिले जाते.
आयोडिनकरणाचा प्रयोग यशस्वीपणे राबविल्यास मुलांच्या शैक्षणिक क्षमतेत वाढ होणे, प्रौढांची कार्यक्षमता वाढणे. याशिवाय जीवनमानाचा दर्जा उंचावणे यासारखे मनुष्यबळ विकासाशी निगडीत फायदे होतात. आयोडिनयुक्त मीठ गर्भवती स्त्रिया, अर्भके तसेच आजारी व्यक्तींसाठी सुध्दा सुरक्षित असते.
डॉ. श्रीराम गोगुलवार
प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,
नागपूर