
दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । मुंबई । महाबळेश्वर भिलार येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया अधिवेशनाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काल दिले.मुख्यमंत्र्यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला असून त्यानुसार अधिवेशनाची तारीख निश्चित होणार आहे.
महाबळेश्वर येथील पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार येथे होणाऱ्या अधिवेशन संयोजन समितीचे अध्यक्ष व संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष विकास भोसले,राज्य कार्यकारिणी सदस्य तथा भिलारचे स्थानिक संयोजन प्रमुख सचिन भिलारे,राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे, कुंदन हुलावळे व रोहन नलावडे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.या वेळी सोलापूरचे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या व्यक्तीचित्राची आकर्षक फ्रेम आणि सातारा जिल्ह्यात अनेक विक्री केंद्र असलेल्या सचिन जाधव यांचे कंदी पेढे देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या जन्मगाव टेंभू ता.कराड येथील आगरकर स्मारक व अनेक उपक्रमांविषयीचे निवेदन तसेच डिजिटल मिडियाच्या अधिस्वीकृतीसह विविध प्रश्नांचे निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.त्यांनी सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.वर्षा निवासस्थानी शिष्टमंडळाने श्रीगणेशाचे दर्शन घेतले.यावेळी निवासस्थान व्यवस्थापनाने राजा माने यांचा सत्कार केला.