मराठवाडा मुक्ती गाथा ( भाग -७ )


दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । लातूर । स्टेट काँग्रेसने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष तीव्र झाला , जुलूम व अन्याय यांचा प्रतिकार करणे हीच खरी ईश्वरभक्ती आहे. असे स्वामीजींचे सूत्र होते. सत्याग्रहींच्या सर्व तुकड्यांमध्ये मराठवाड्यातील तरुण आघाडीवर होते. गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे यांनी कुशलपणे सत्याग्रहीचे संघटन केले. मराठवाड्यातील 350 सत्याग्रहींनी भाग घेतला. सत्याग्रहासाठी तरुणांची मने प्रज्वलित करण्यासाठी गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे , बाबासाहेब परांजपे, पुरुषोत्तमराव चपळगावकर, कर्वे गुरुजी यांनी मोलाचे योगदान दिले. स्टेट कॉंग्रेस व जातीयवादी संघटना यांच्या सत्याग्रहामध्ये गल्लत होऊन स्टेट काँग्रेसबद्दल गैरसमज वाटू लागले. म्हणून महात्मा गांधीजींच्या आदेशावरून स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह स्थगित करण्यात आला.

आर्य समाजाचे कार्य
संस्थानात आर्य समाजाने अखिल भारतीय स्वरूपाचा लढा दिला. हैदराबाद संस्थांनातील हिंदू प्रजेवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात आर्य समाज सफल ठरला. आर्य समाजाने 24 ऑक्टोबर, 1938 पासून पुढे जवळपास दहा महिने सत्याग्रहाचा लढा चालवला. हिंदू संघटन करणाऱ्या आर्य समाजावर निजामाचा रोष होता. त्यामुळे संस्थांनात व मराठवाड्यात आर्य समाजाच्या शाखा वाढल्या. आर्य समाजाला जात, पात भेद व स्त्री – पुरुष भेद मान्य नव्हता, म्हणून त्यांनी अनेक अस्पृश्यांना वैदिक धर्मात समाविष्ट करून घेतले. संस्थानात 1941 पर्यंत आर्य समाजाच्या 241 शाखा कार्यरत होत्या. आर्य समाजाचे 12 हजार पेक्षा अधिक सत्याग्रही तुरुंगात गेले. संस्थानात एकूण 40 हजार एवढे आर्य समाजाचे अनुयायी असल्याचे दिसून येते. तेलंगण, कर्नाटक विभागाच्या तुलनेत मराठवाडा विभागात आर्य समाज अधिक प्रभावी होता. आर्य समाजाने सक्तीच्या धर्मांतरास विरोध केला. आर्य प्रतिनिधी सभेने शिष्टमंडळ पाठवून संस्थांनातील परिस्थितीची पाहणी करण्यात यश मिळवले. मराठवाड्यात धारूर, गुंजोटी, निलंगा, उमरगा, उदगीर येथील आर्य समाजी लोकांवर अधिक अन्याय झाले. गुंजोटी येथील तरुण कार्यकर्ता वेदप्रकाश याची क्रुर हत्या झाली. हैदराबाद संस्थानातील पहिला हुतात्मा वेदप्रकाशकडे झाले, आणि मराठवाडा मुक्ती चळवळीने सशस्त्र लढा हाती घेतला. उदगीरला शामलाल यांनी आर्य समाजाच्या चळवळीचे प्रभावीरीत्या संघटन केले. भाई शामलाल यांची बिदर तुरुंगात हत्या करण्यात आली. निझाम शासनाच्या अन्याय व अत्याचारामुळे संस्थानात आर्य समाजाची लोकप्रियता वाढत गेली व त्यातूनच चळवळीत नव-नवीन कार्यकर्ते व नेते उदयाला आले. आर्य समाजाने निजामाकडे केलेल्या 14 मागण्या केल्या होत्या. संस्थानात आर्य समाजाच्यावतीने पहिला सत्याग्रह दि. 31 जानेवारी, 1939 ला झाला. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतून आर्य समाजाच्यावतीने सत्याग्रह झाले. नारायण स्वामी, नरदेव शास्त्री, नरेंद्र देव, बन्सीलाल, शेषराव वाघमारे, आनंद स्वामी, दिगंबरराव लाटकर, दिगंबरराव शिवणगीकर, निवृत्ती रेड्डी, गणपतराव कथले, शंकरराव पाटील अंधोरीकर यांनी आर्य समाजाच्या चळवळीत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला ….

क्रमशः

@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर


Back to top button
Don`t copy text!