
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आणि आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद कॉलेजच्या सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची ज्येष्ठ नागरिकांकरीता योजना 2016 आणि ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि लाभार्थ्यांना योजनेशी जोडण्यासाठी पावले उचलणे या विषयी जागरुकता कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती एन. ए. ओतारी यांनी या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यसाठी पावले उचलण्यासाठी काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले आणि अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
ॲङ मनिषा वर्गे यांनी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन या विषयी माहिती देवून त्याचे महत्व विषद केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व त्यांच्याकरीता असलेली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजने विषयी सखोल माहिती दिली. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी व त्यांना कोणत्या सुविधा मिळू शकतात व त्या मिळवून देण्यासाठी जागरुकता निर्माण होण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले जातात असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, 72 शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.