दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे सातारा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या सहभागातून ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय कार्यालय स्तरावर पार पडला.
या उपक्रमात सात उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे त्यांच्या उपविभागाच्या ठिकाणी सदर उपक्रमाकरीता हजर राहून जिल्ह्यातील एकूण १२४ नागरिकांशी त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने संवाद साधला. या उपक्रमात एकूण ७२ अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या अनुषंगाने ३ अदखलपात्र गुन्हे, १२ प्रतिबंधक कारवाया, २२ अर्ज चौकशीकरीता दाखल करण्यात आले. ३ अर्ज इतर विभागांकडे वर्ग करण्यात आले आहेत. तसेच ११ अर्जांच्या अनुषंगाने संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून ३९ अर्ज अभिलेखावर दाखल करण्यात आलेले आहेत.
दरम्यान, सातारा पोलीस दलामार्फत दर १५ दिवसांनी म्हणजेच महिन्यातील पहिल्या व तिसर्या गुरुवारी सकाळी १० ते १ या वेळेत ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिक, सैनिक व त्यांचे नातेवाईक यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही सातारा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे तक्रारदारांना त्यांच्या तक्रारींकरीता विनाकारण पोलीस अधीक्षक कार्यालयास तक्रार घेऊन जावे लागणार नाही. तसेच पोलीस विभागाशी संबंधित सर्व समस्या त्यांच्या जवळच्या ठिकाणी तात्काळ सोडविण्यात मदत होईल.