
थेट WhatsApp वर मिळवा
केंद्राने एकीकृत वाहतूक लॉजिस्टिक प्राधिकरणाच्या स्थापनेला मंजुरी दिली असून नॅशनल ट्रान्सपोर्ट मास्टर प्लॅनमुळे वाहतूक खर्च आणि वेळ बचत होणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०८ ऑक्टोबर : देशातील मालवाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि सुटसुटीत बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडून एकीकृत वाहतूक लॉजिस्टिक प्राधिकरणाची (Integrated Transport Logistics Authority – ITLA) स्थापना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या प्राधिकरणाद्वारे ‘नॅशनल ट्रान्सपोर्ट मास्टर प्लॅन’ची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
एकाच छताखाली येणार वाहतूक यंत्रणा
सध्या रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई वाहतूक या प्रत्येक क्षेत्राचे धोरण वेगळे असल्याने लॉजिस्टिक क्षेत्रात समन्वयाचा अभाव दिसून येतो. ITLA च्या स्थापनेमुळे सर्व वाहतूक मार्ग एकाच छताखाली आणले जातील, ज्यामुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
व्यापार आणि व्यवसाय सुलभतेला चालना
या निर्णयामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठी गती मिळणार असून ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ला प्रोत्साहन मिळेल. पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक कोंडीवर उपाययोजना आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी हे प्राधिकरण अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





