राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिनाबाबत निर्देश; परिपत्रक जारी


दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राष्ट्र पुरुष / थोर नेत्यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम यावर्षी मंत्रालय व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या परिपत्रकामध्ये दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, शनिवारी व रविवारी येत असले तरी, ते कार्यक्रम त्या त्या दिवशी साजरे करण्यात यावेत. राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंतीदिनी सर्व शाळा / महाविद्यालये येथे जयंती साजरी करताना संबंधित राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांनी देशासाठी केलेल्या अनमोल कार्याची सर्व शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या अनुषंगाने व्याख्याने, निबंध स्पर्धा अशाप्रकारचे विविध कार्यक्रम शाळा तसेच महाविद्यालयात आयोजित करण्यात यावेत. जेणेकरुन भावी पिढीला राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांनी देशासाठी केलेल्या महान कार्याची माहिती होईल, तसेच जयंती दिन सुट्टीच्या दिवशी येत असल्यास शाळा / महाविद्यालये यांनी राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्याबाबत व्याख्याने, निबंध स्पर्धा अशाप्रकारचे विविध कार्यक्रम सुट्टीच्या आदल्या दिवशी आयोजित करण्याच्या सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त महानगरपालिका यांनी त्यांच्या विभागातील / जिल्ह्यातील / महानगरपालिकेतील सर्व शाळा / महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दि. 5 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेले हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२२०९०६१५५३१३०२०७ असा आहे.


Back to top button
Don`t copy text!