ईव्हीएमवर बोलण्यापेक्षा विकासावर भाष्य करावे

फलटणमधील साहित्यिक संवादातील सूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ डिसेंबर २०२४ | फलटण |
प्रत्येक मतदाराने आपल्या मताचे अवमूल्यन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या देशात ईव्हीएमवर मतदान घेतले जाते, ते सत्य दाखवते. त्यामुळे ईव्हीएमवर बोलण्यापेक्षा विकासावर भाष्य केले पाहिजे. चुकून जर मतदार राजा विकला गेला तर लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक मतदाराने विचारपूर्वक मतदान करून योग्य प्रतिनिधी निवडून दिला पाहिजे व आपली लोकशाही अधिक बळकट केली पाहिजे, असा सूर साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण व वनविभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नाना-नानी पार्क, फलटण येथे आयोजित केलेल्या साहित्यिक संवादामध्ये साहित्यिकांनी मांडला.

भारतीय लोकशाही ही प्रगल्भ आहे. या लोकशाहीमध्ये सर्वांना समान हक्क, न्याय आहे. ‘संविधान’ हा भारताचा आत्मा असून त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी, असे प्रत्येकाला वाटते. मात्र, त्यानुसार आपला राज्यकारभार चालतो. हा राज्यकारभार चालवणारी यंत्रणा म्हणजे मतदारांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तसेच शासकीय कर्मचारी. नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरळीतपणे पार पडल्या. त्यानंतर बर्‍याच गोष्टी घडून गेल्या. आरोप-प्रत्यारोप झाले. निवडणुकीत मतदार हा राजा असतो. त्याला त्याच्या मताचा पूर्ण अधिकार असतो. मतदारांनी विचार करून मतदान केले पाहिजे व लोकशाही बळकट केली पाहिजे, असेही विचार या साहित्यिक संवादात मांडले गेले.

सुरुवातीला सर्वांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्रा. सुधीर इंगळे, अ‍ॅड. आकाश आढाव, प्रा. श्रेयश कांबळे, अतुल चव्हाण, संजय पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविक व स्वागत ताराचंद्र आवळे यांनी करून साहित्यिक संवाद परिसंवादातील लोकशाहीतील मतदारांचे योगदान, मतदानाचा टक्का वाढला. खरंच जनजागृतीचे यश आहे, माझ्या मनातील कविता, अशी सुचली कथा यावर प्रकाशझोत टाकला.

यावेळी राहुल निकम, अतुल चव्हाण, अविनाश चव्हाण यांनी आपल्या संविधानावरील कविता सादर करून संविधानाची जागृती केली. साहित्यिक संवादाचे सूत्रसंचालन विकास शिंदे यांनी केले तर आभार श्रीनिवास लोंढे यांनी मानले.

कार्यक्रमास फलटण तालुक्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमी, तसेच साहित्यिक संवादाचे सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!