
दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। बारामती । एसटीचे चालक तणावमुक्त रहावेत या उद्देशाने काही वर्षापूर्वी समुपदेशक नेमण्यात आले होते. परंतु पुरेसे समुपदेशक मिळाले नसल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे. समुपदेशक नेमण्यापेक्षा चालकांना चांगल्या सोयी सुविधा देण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
श्रीरंग बरगे म्हणाले, एसटीमध्ये काही वर्षापूर्वी एक अघटीत घटना घडली. त्या घटनेविरोधात समाजातील सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे डिसेंबर 1917 मध्ये चालक पदातील कर्मचार्यांसाठी समुपदेशक नेमण्याची संकल्पना अमलात आणली गेली. प्रवासी बस चालवणे हे जोखमीचे काम असून चालक तणाव मुक्त असावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. तीन ते चार आगारांसाठी एक या प्रमाणात एकूण 63 समुदेशक मानद तत्वावर घेण्याचे निश्चित करण्यात आले. समुपदेशकाना रुपये चार हजार रुपये मानधन देण्याचे ठरले. त्यासाठी शैक्षणिक अर्हता एम. एस. डब्लू. व किमान तीन वर्षाचा अनुभव अशा अटी निश्चित करण्यात आल्या. परंतु इतक्या अल्प मानधनावर काम करायला समुपदेशक तयार नाहीत. त्यामुळे अपेक्षित उमेदवार मिळालेच नाहीत. सध्या फक्त 20 समुदेशक आहेत. त्यामुळे ही योजना तात्काळ बंद करावी अशी मागणी बरगे यांनी केली आहे.
श्रीरंग बरगे म्हणाले, सध्या स्थितीत चालकांची मनस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे. चालकांना चांगले विश्रांतीगृह नाहीत. बर्याच विश्रांतीगृहात ढेकूण व घाणीचे साम्राज्य असल्याने त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. काही आगारात चांगले स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाही. गरजेच्या वेळी रजा देण्यात येत नाहीत. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. एसटीचे चालक सुरक्षित प्रवासी वाहतूक देण्यात देशात अव्वलस्थानी आहेत. मंजुरीच्या अर्धेही कामगार अधिकारी उपलब्ध नाहीत, असेही बरगे यांनी सांगितले.