दैनिक स्थैर्य | दि. २९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
साहित्यसंस्कृती जपण्यासाठी वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे साहित्य निर्माण करून घराघरात साहित्यवाचक निर्माण होतील, असे साहित्यिकांनी साहित्य निर्माण केले पाहिजे. लिखाणाची प्रेरणा वास्तववादी परिस्थितीतून मिळत असते. त्यासाठी साहित्यिकांनी अंतर्मुख होऊन सकारात्मक विचाराने लिखाण करावे. दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढला पाहिजे, असे मत साहित्यिक हरिराम पवार यांनी मांडले.
साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांनी नाना नानी पार्क, फलटण येथे आयोजित केलेल्या वर्षपूर्ती साहित्यिक संवाद व मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, महादेवराव गुंजवटे, सुरेश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
हरिराम पवार पुढे म्हणाले की, मला कष्टकरी, कामगार यांचेकडून लिखाणाची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच प्रौढ साक्षरता या विषयावर विपुल लेखन करता आले. साहित्यिकांनी मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी स्वतःपासून सुरूवात केली पाहिजे. यावेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ल. म. कडू यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तसेच गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी मराठी भाषेचा गोडवा, मराठी भाषेचे महत्व व आजची मराठी यावर ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, महादेवराव गुंजवटे, रानकवी राहुल निकम, सौ. सुलेखा शिंदे प्रा. डॉ. अशोक शिंदे, विकास शिंदे, संजय पांचाळ, श्रेयस कांबळे, अॅड. आकाश आढाव, अथर्व पवार, संग्रह कांबळे, प्रा. डॉ. कोकिळा चांगण यांनी समर्पक शब्दात कविता व मनोगतातून आढावा घेतला.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी केले तर आभार सुरेश भगत यांनी मानले. यावेळी सौ. अलका बेडकीहाळ, सचिन जाधव, स्वरूप पांचाळ, प्रीतम लोंढे, अश्विनी क्षीरसागर, अश्विनी गायकवाड तसेच फलटण तालुक्यातील अनेक लेखक, कवी, साहित्य रसिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.