स्थैर्य, वाई, दि.१२ : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला प्रवास करताना रस्त्यामध्ये जखमी अवस्थेत सापडलेल्या जंगली कबुतराला जीवदान दिले.
राजस्थान येथील मेरठ हॉटेल फूड स्टुडिओचे व्यवस्थापक आणि प्राणीमित्र दिनेश सिंग हे महाबळेश्वर, पाचगणी येथे पर्यटनासाठी आले आहेत. त्यांना महाबळेश्वर प्रवासात एक जंगली कबूतर जखमी अवस्थेत सापडले. श्री. सिंग यांनी लागलीच या कबुतराला पकडून आपल्या गाडीत घेतले .स्थानिक प्राणिमित्रांची माहिती घेऊन महाबळेश्वर ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केलगणे यांना संपर्क केला व त्यांना बोलावून घटनेची माहिती दिली. श्री. केलगाने यांनी लगेच हे जखमी कबूतर घेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार करून बरे झाल्याचे खात्री करून त्या कबुतराला जंगलात सुरक्षितपणे सोडून दिले. याबद्दल दिनेश सिंग व अनिल केलगने या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.