महाराष्ट्रात ३ लाख ३० हजार कोटींचे औद्योगिक करार : उद्योगमंत्री सुभाष देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२१ |  नवी दिल्ली  | महाराष्ट्र राज्यात  मागील दोन वर्षात ३ लाख ३० हजार कोटींचे औद्योगिक करार झाले असून गुंतवणूकदांरानी राज्याला प्रथम पसंती दर्शविली असल्याची माहिती आज राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटना प्रसंगी दिली.

40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन प्रगती मैदान येथे करण्यात आले आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांच्यासह महाराष्ट्र लघु विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

श्री.देसाई पुढे म्हणाले, मागील दोन वर्षात 2019-20 आणि 2020-21 या महामारीच्या कठीण काळातही राज्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. जवळपास 3 लाख 30 हजार कोटी रूपयांचे औद्योगिक करार झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या माध्यमाने राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असून याचा लाभ महाराष्ट्रातील नागरिकांना होईल. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकीकरणात नेहमीच पुढारलेले राज्य राहिले असल्याचा उल्लेख करीत, या औद्योगिक विकासाची घोडदौडची प्रगती मैदानाच्या महाराष्ट्र दालनातही दिसत असल्याचे श्री.देसाई यावेळी म्हणाले.

दालन राज्याच्या प्रगतीचा आरसा

महाराष्ट्राचे दालन कलात्मक आहे. दालन पाहिल्यानंतर त्यात महाराष्ट्र राज्याची छाप दिसते.  संपूर्ण मेळ्यात महाराष्ट्राचे दालन आकर्षणाचे केंद्र  दिसत आहे. राज्याची औद्योगिक प्रगती तसेच राज्यातील लघु उद्योग एकाच ठिकाणी मांडण्यात आले आहेत. इलेक्ट्रिकल वॅहिकेल उभे केले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आरसा हे दालन असल्याचे उद्योग मंत्री म्हणाले.

राज्यात विविध  50 कल्सटर

खेड्यांमध्ये जी संस्कृती आहे तिला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन हस्तकलेच्या, चामड्यांच्या वस्तू, वस्त्र, खाद्यपदार्थ, बांबू, रबर, टेरी टॉवेल या उद्योग समुहांचे निर्माण केले आहे. सध्या राज्यात 50 कल्सटर तयार केले आहेत व भविष्यात मागणीनुसार अधिक कल्सटर निर्माण केले जातील.  यामध्ये महाराष्ट्राचे राजवस्त्र असणारी पैठणीचे कल्सटर तयार करण्यात आले आहे.  यामुळे गावागावातील विविध उद्योजक एकाच ठिकाणी येत आहेत.  त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमांमुळे उद्योजकांना बराच फायदा झाला असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.

आंतराराष्ट्रीय दर्जाचे शेंद्रा औद्योगिक वसाहत केंद्र

औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ही वसाहत देशातील सर्वात महत्त्वाची अशी औद्यगिक वसाहत असल्याचे श्री.देसाई म्हणाले. निती आयोगाच्या सदस्याने या वसाहतीला भेट दिली असून ये‍थील पायाभूत सुविधा तसेच तत्संबंधी सुविधाबद्दल समाधान व्यक्त केले असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.

बल्क ड्रग पार्क

बल्क ड्रग पार्क ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असल्याची माहिती  श्री.देसाई यांनी दिली. पुणे, नाशिक येथे हे बल्क ड्रग पार्क उभारण्यात येत आहे. यामुळे औषध उत्पाकदतेवर सकारात्मक परिणाम होईल. यासह रोजगार निर्मितीतही वाढ होईल, अशी आशा श्री.देसाई यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात इलेक्ट्रिकल वेहिकल धोरण जाहीर

उद्योग, परिवहन आणि पर्यावरण  विभागाने मिळून  इलेक्ट्रिकल वेहिकल धोरण  दोन महिन्यांपूर्वी  जाहीर केले आहे. ग्राहकांचा प्रतिसाद मिळावा म्हणून प्रत्येक वाहनामागे 1 लाखापासून ते 3 लाखांपर्यंत अनुदान दिले जात असल्याची माहिती श्री.देसाई यांनी यावेळी दिली. यामुळे ग्राहक वाहनांच्या खरेदीबाबत अधिक आकर्षित होतील, अशी अपेक्षा श्री.देसाई यांनी व्यक्त केली.

इलेक्ट्रिकल वाहनाच्या वापरामुळे वाढत्या इंधन दरापासून तसेच प्रदूषणापासून सुटका मिळेल, असा आशावाद श्री.देसाई व्यक्त करत ग्राहकांसारखेच, उत्पादकांनाही भरघोस सवलती दिल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले. यामुळे गुंतवणूकदारही उत्साही आहेत. टाटा आणि टेल्सा समूहाने यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविली आहे. यासंदर्भातील बैठका सुरू आहेत. या सर्व सकारात्मक पाऊलांमुळे राज्यात इलेक्ट्रिकल वाहनांबाबत गतीशिलता वाढण्यास नक्कीच मदत होईल, अशी प्रतिक्रिया दिली.

“आत्मनिर्भर” ही संकल्पना मांडताना यंदा उद्योग क्षेत्रातील राज्याची भरारी तसेच डिजिटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास, निर्यात, लघुउद्योग, स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, आदी सर्वच विषयांना स्पर्श करणारे आकर्षक प्रदर्शन यंदा मांडण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे 13 स्टॉल्स आहेत. बचत गटांचे 8 स्टॉल्स, कारागिरांचे 7 स्टॉल्स, सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमांतर्गत येणारे उद्योग समूह (क्लस्टर) चे 8 स्टॉल्स आणि  स्टॉर्टअप चे 6 स्टॉल्स उभारलेले गेले आहेत.

ही प्रदर्शनी आजपासून खूली झाली असून 19 नोव्हेंबरपर्यंत व्यापारी वर्गासाठी प्रवेश असणार आहे. 20 ते 27 नोव्हेंबरपर्यंत सामान्यांसाठी प्रवेश असणार आहे. या प्रदर्शनाला प्रवेश शुल्क असून मेट्रो 65 स्थानकांवर सशुल्क प्रवेशिका उपलब्ध असेल. प्रगती मैदानच्या नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीत, क्रमांक दोनच्या हॉलमध्ये महाराष्ट्र दालन आहे. महाराष्ट्र दालनाला जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लघु विकास महामंडळाच्या पदाधिकाऱ्‍यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!