दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
महात्मा एज्युकेशन सोसायटीचे श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय आणि चतुराबाई शिंदे बालक मंदिर येथे भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. अलका बेडकिहाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, युवा उद्योजक भारद्वाज बेडकिहाळ, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर (प्राथमिक), भिवा जगताप (माध्यमिक), सुरेखा सोनवले (बालक मंदिर) आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी इ. ७ वी, ८ वी च्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत सादर केले. यावेळी उपस्थित सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली. इ. ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे करून आपल्यातील वक्तृत्व कलेचे दर्शन घडवले.
यावेळी भारती विद्यापीठ गणित, इंग्रजी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या तसेच चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
संस्थेच्या तिन्ही शाखा गुणवत्ता आणि भौतिक सुविधा यामध्ये उत्तम प्रगती करत आहे.पालकांनी शाळेच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ यांनी केले.
मनीष निंबाळकर, भिवा जगताप, सुरेखा सोनवले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. अरुण खरात यांनी आभार मानले. हेमलता गुंजवटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.