दैनिक स्थैर्य । दि. २९ मार्च २०२३ । फलटण । रेल्वे मंत्रालयाने स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी “अमृत भारत स्थानक” योजना या शीर्षकाखाली नवीन धोरण तयार केले आहे. अमृत भारत स्थानक योजनेत दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सतत विकास केला जाणार आहे . हा विकास दीर्घकालीन बृहत नियोजन तसेच स्थानकाच्या गरजा आणि संरक्षणानुसार तयार आराखड्यातील घटकांच्या अंमलबजावणीवर आधारित आहे. या योजनेमध्ये फलटण रेल्वे स्थानकाचा समावेश करत असल्याची घोषणा ना. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांच्या संसदेमधील दालनामध्ये आयोजित बैठकीमध्ये ना. अश्विनी वैष्णव बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती.
माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेली फलटणची रेल्वे ही त्यांचे सुपुत्र व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अथक परिश्रम घेत सुरू केली. त्यानंतर आता फलटण वरून फक्त लोणंद न राहता आता पुणे रेल्वे सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. खासदार रणजितसिंह यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आगामी काळामध्ये फलटण – पंढरपूर व फलटण – बारामती रेल्वे सुद्धा पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे खासदार रणजितसिंह यांच्या मागणीनुसार फलटण रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेमध्ये समावेश करत आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांनी केली.
खासदार रणजितसिंह हे अतिशय लोकप्रिय लोकप्रतिनिधी झालेले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे अतिशय उत्कृष्ट असा पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामूळे माढा लोकसभा मतदारसंघातील बरेच प्रश्न निकाली निघाले आहेत. आगामी काळामध्ये जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सुद्धा खासदार रणजितसिंह यांच्या पाठपुराव्याने निकाली निघतील, असा विश्वास सुद्धा रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेची व्यापक उद्दिष्टे
◆ या योजनेचे उद्दिष्ट रेल्वे स्थानकांचा बृहत आराखडा तयार करणे आणि त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे, किमान अत्यावश्यक सुविधा आणि अन्य सुविधांचा विस्तार, स्थानकावर रूफ प्लाझा आणि सीटी सेंटर निर्माण करणे हे देखील आहे.
◆ योजनेचे उद्दिष्ट भागधारकांच्या गरजा पूर्ण करणे, निधीची उपलब्धता आणि परस्पर प्राधान्य यावर आधारित स्थानकाच्या वापराचा अभ्यास करणे असेल.
◆ ही योजना नवीन सुविधांचा परिचय करून देईल तसेच सध्याच्या सुविधा अद्ययावत करणे आणि बदलणे याची पूर्तता करेल.
◆ या योजनेत त्या स्थानकांना देखील समावेश असेल, जिथे तपशीलवार तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यास केला गेला आहे किंवा सध्या केला जात आहे परंतु छतावर प्लाझा बांधण्याचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही. यासाठी मास्टर प्लॅन योग्यरित्या टप्प्याटप्प्याने अंमलात आणणे, संरचनांचे स्थान बदलणे आणि उपयुक्ततता सुनिश्चित करणे या बाबींंवर टप्पाटप्प्याने अधिक भर दिला जात आहे.
ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत निवडलेल्या स्थानकांकरिता खालील विस्तृत कार्यक्षेत्राची रूपरेषा मांडण्यात आली आहे.
◆ भविष्यात तयार केल्या जाणाऱ्या रूफ प्लाझाच्या सर्वात योग्य स्थानाचे प्राथमिक तपशील असणारा बृहत आराखडा विद्यमान इमारतीच्या वापराचे पुनरावलोकन केले जाईल आणि स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी जागा सोडण्यात येईल आणि रेल्वे कार्यालये योग्य ठीकाणी स्थलांतरित केली जातील.
◆ एक स्थानक एक उत्पादनासाठी किमान दोन स्टॉल्सची तरतूद केली जाईल.
◆ एक्झिक्युटिव्ह लाउंज आणि छोट्या व्यावसायिक बैठकांसाठी देखील जागा उपलब्ध केली जाईल.
◆ सर्व श्रेणीच्या स्थानकांवर उच्च स्तरीय प्लॅटफॉर्म (760-840 मिमी) तयार केले जातील.
◆ प्लॅटफॉर्मची लांबी साधारणपणे 600 मीटर असावी.
◆ प्लॅटफॉर्म छताची लांबी, स्थान आणि टप्पा स्थानकाच्या वापराच्या आधारे ठरवले जातील.
◆ स्थानकांवरील दिव्यांगजनांसाठी सुविधा रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील.