स्थैर्य, सातारा दि.७: छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पीटलचे ऑन लाईन उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि. 9 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खा. श्री. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. मोहनराव कदम, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
या हॉस्पीटलमध्ये 234 ऑक्सीजन बेड व 52 आयसीयु बेड आहेत. डायलिसीस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत अशा रुग्णांसाठीही 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची तपासणी करुन या रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
सातार्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या नूतन इमारतीमध्ये सुमारे 14 कोटी खर्चाचे जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. सदर कोविड हॉस्पिटलमध्ये 234 ऑक्सिजन बेड आणि 52 आयसीयू बेडची उपलब्धता करण्यात आली असून, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य व कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना या हॉस्पिटलचा फायदा होणार आहे. तसेच हे हॉस्पिटल फक्त कोविडसाठी नसून याचा उपयोग भविष्यात मेडिकल कॉलेजसाठी सुद्धा केला जाणार आहे.
मुख्यत: या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी 268 जणांचा स्टाफ उपलब्ध करण्यात आला आहे. या स्टाफची संपूर्ण जवाबदारी पुणे येथील रुबी -एल – केअर या संस्थेला देण्यात आली आहे . आयसीएमआर च्या मानांकाप्रमाणे कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली असून संग्रहालयाची दालने प्रशस्त असल्याने वायुवीजनाची चांगली सोय आहे . हॉस्पिटलला तिन्ही बाजूने प्रवेश असून येथील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल 48 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे . स्वच्छता आणि टापटीप तसेच सुसज्ज दालने अद्ययावत सुविधा , ऐसपैस पार्किंग व्यवस्था स्वतंत्र चेंजिंग व स्टाफ रुम व रुग्णांना निःशुल्क सेवा इ वैशिष्टयांनी कोविड हॉस्पिटल लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे . या हॉस्पिटलच्या पाठपुराव्यासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे ना.निंबाळकर, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व जिल्हा प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले आहे.