छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये लघुपट,चित्रपट,नाट्यसंहिता लेखन कार्यशाळेचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । सातारा । ‘’जग जिंकणारे वक्तृत्व लगेच येत नाही पण त्याला संधी देऊन कौशल्य वाढले पाहिजे. विद्यार्थ्याचे चुकत असेल तर दुरुस्त करा,पण त्यांच्या कला गुणांचे संवर्धन करा. या विद्यार्थ्यांना चांगले वक्ते,लेखक ,कलावंत, यांचे पर्यावरण उपलब्ध करून द्या. विद्यार्थ्यांच्या आविष्कारांना व्यासपीठ उपलब्ध तयार करून दिले तर नवी पिढी निर्माण होईल. जीवघेण्या स्पर्धेत ठाम सक्षमपणे उभा करायचे असेल आणि मुल्याधिष्ठित समाज निर्माण करायचे असेल तर विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये शिकावी लागतील. खाणीतील हिऱ्याला दगडासारखे मुल्य असते. पण त्याच हिऱ्याला कारागिराने विविध पैलू पाडले तर त्याचे मुल्य वाढते. तो इतका अनमोल होतो की त्याच्याजवळ देखील पुन्हा जाता येत नाही इतकी त्याची किंमत वाढते. तसेच विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडतील अशी कौशल्ये दिली तर त्याची गुणवत्ता वाढते. विद्यार्थ्यांच्या स्पार्कला नाउमेद करून त्यांचे उमलते अंकुर खुडून टाकू नका. केवळ मार्क्स महत्वाचे नसून त्यांच्या ,क्रीडा ,वक्तृत्व, नाट्य इत्यादी विविध कलांकौशल्याना प्रोत्साहन दिले पाहिजे. स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आत्मविश्वास देणारे शिक्षण द्यायला हवे’’असे विचार रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले. ते येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आयोजित केलेल्या ‘लघुपट,चित्रपट ,नाट्य संहिता लेखन कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते .अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर हे उपस्थित होते. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट विजेते विषयतज्ञ मितेश ताके,शिवाजी करडे,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष
प्रा.डॉ.प्रकाश दुकळे,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,डॉ.कांचन नलवडे ,यांची प्रमुख उपस्थिती होती. रयत शिक्षण संस्था ही नेहमी काळाच्या पुढे पावले टाकीत असते हे सांगताना ते पुढे म्हणाले की’’ जागतिकीकरण सुरु झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदराव पवार यांनी काळाची पावले ओळखून संस्थेच्या सर्व शाखेत संगणक पोचवण्यासाठी ४-५ कोटीची तरतूद केली होती. स्वतःच्या पायावर उभा राहणारे शिक्षण देणार नसाल तर शिक्षण कुचकामी ठरेल.स्पर्धा मोठी आहे.पाश्चात्य विद्यापीठे येत आहेत .विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयोग म्हणजे शिक्षण असे मी मानतो.. शिक्षणाचामूळ उद्देश मार्क्स मिळविणे नव्हे तर विद्यार्थ्यांच्यामध्ये
असणारया सुप्त कला गुणांचा शोध घेणे हा आहे. आज प्रसारमाध्यमे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. मालिकांची संख्या वाढली आहे. चांगली पटकथा लिहिणारी माणसे आज शोधावी लागतात .संभाजी मालिका प्रताप गंगावणे यांनी लिहिली अशी अनेक माणसे विद्यार्थ्यांच्यापुढे आणायला हवीत. स्क्रिप्ट तयार करणे ही तपश्चर्या आहे, समाजाचा अभ्यास,प्रतिभा असावी लागते.निरीक्षण शक्ती हवी .कार्यशाळा म्हणजे व्याख्यान नव्हे. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने ठेवलेले हे काम अतिशय दिशादर्शक आहे’’असे सांगून त्यांनी कार्यशाळेची प्रशंसा केली. या राष्ट्रीय कार्यशाळेस सातारा ,कोरेगाव,रहिमतपूर ,कोरेगाव ,उंब्रज ,इत्यादी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले.डॉ.संजयकुमार सरगडे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!