स्थैर्य, फलटण, दि. ९ : फलटण तालुक्यामध्ये खो-खो खेळाप्रमाणे कुस्ती खेळामध्ये मुलींनी पुढे येऊन खेळणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये फलटणचे नाव देशपातळीवर पोहोचण्यासाठी मुलींनी प्रयत्न करावेत असे मत महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त फलटण तालुका क्रीडा संकुल मध्ये मुलींच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, फलटणचे तहसीलदार समीर यादव, फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटण तालुक्याला खेळाची उज्वल परंपरा आहे. फलटण तालुक्यामधील खेळाडू हे राज्यासह देशपातळीवर विविध खेळ खेळलेले आहेत. तरी कुस्तीमध्ये मुलींनी मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येऊन कुस्ती क्षेत्रांमध्ये फलटणचे नाव मोठे करावे व फलटणला अभिमान वाटेल असे खेळ खेळावेत.
ऑलिंपिकवीर कुस्ती पैलवान खाशाबा जाधव यांचे नाव जसे संपूर्ण राज्यामध्ये काढले जाते. त्याचप्रमाणे फलटण येथील मुलींनी खेळ खेळून कुस्तीमध्ये आपले एक वेगळे नाव निर्माण करावे व आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्यासह सांगली कोल्हापूर व संपूर्ण राज्यांमधील सर्वांनाच आपल्या वेगळ्या नावाने ओळख निर्माण करून द्यावी, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
जागतिक महिला दिनानिमित्त फलटण येथील क्रीडा संकुलामध्ये सुरू करण्यात आलेल्या महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून फलटण तालुक्यामधील ज्या मुली व महिलांना कुस्ती मध्ये प्रावीण्य मिळवायचे आहे, त्यांनी या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी यावेळी केले.
महिला या कोणत्याही क्षेत्रामध्ये आता मागे राहिलेल्या नाहीत. कुस्तीमध्ये सुद्धा जर राज्याचा विचार केला तर त्यामध्ये ही मुली व महिला या कुस्ती हा खेळ खेळत असतात. तरी फलटण तालुक्यातील मुलींनी कुस्ती खेळ खेळण्यासाठी फलटण फलटण तालुका क्रीडा संकुलामध्ये प्रशिक्षण घेऊन उत्तोमत रित्या कुस्ती खेळ खेळावा व महिलांनी आपले आरोग्य व्यवस्थित कोणता ना कोणता खेळ खेळणे हे अत्यंत गरजेचे आहे, असेही यावेळी फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी महेश कुटाळे यांनी केले. सदर कार्यक्रमास जाधववाडीच्या सरपंच सौ. सिमा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सौ. सारिका चव्हाण, दिपक सपकाळ, महाराष्ट्र केसरी बापुसाहेब लोखंडे, क्रीडा शिक्षक तुषार मोहिते व सचिन धुमाळ उपस्थित होते.