येत्या तीन दिवसात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती


दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । सातारा । सध्याचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे त्यांच्या विकास कामांच्या अपेक्षा आमच्याकडून नक्कीच पूर्ण केल्या जातील . डबल इंजिनचे हे सरकार डबल स्पीडने काम करणार आहे जसा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तसेच येत्या तीन दिवसांमध्ये मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री शिंदे सध्या त्यांचे मूळ गाव दरे तांब येथे वास्तव्यास आहेत महाबळेश्वर तापोळा वाई येथील विविध सत्कार सोहळ्यानंतर मुख्यमंत्री या नात्याने आपल्या मूळ गावी असणाऱ्या निवासस्थानात शिंदे यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला . या संवादामध्ये सातारा जिल्ह्याच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी मांडत आगामी कामकाजाची दिशा सुद्धा स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले लोकांच्या आणि देवीच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत झालं,मी मुख्यमंत्री झालो सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला असल्याचा आनंद सर्वांना झाला. गाव खेड्यातील लोकांना आपला माणूस मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे . गोरगरिबांचे प्रश्न मी प्रामाणिकपणे सोडविल, हे सरकार डबल इंजिनचे आहे त्यामुळे विकासाचा वेग सुध्दा तसाच दुप्पट असणार आहे . भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा विकास कामासाठी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला असून विविध प्रकल्पांसाठी भरघोस निधी देण्याचे सुद्धा कबूल केले आहे . त्यामुळे विकासाच्या संदर्भात कोणीही काळजी करण्याचे कारण नाही .मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता पण तो आता झाला आहे येत्या तीन दिवसात मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात येईल जेणेकरून राज्याच्या कारभाराला गती दिली जाऊ शकते असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

सातारा धरणग्रस्तांचा जिल्हा आहे तसेच येथील पर्यटनाला मोठा वाव आहे या विविध प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक उत्तरे दिली ते म्हणाले कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नांना पुरेपूर न्याय दिला जाईल यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत . तसेच सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून सातारा जिल्ह्यातील दुर्गम भाग हे पुलाने जोडले जाणार आहेत त्यातील एका पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे केबल स्टे पद्धतीचा हा पूल त्याच्यामध्ये गॅलरी सिस्टीम असणार आहे .हा दुर्गम भागाच्या दळणवळणाचा एक मोठा महत्त्वाचा टप्पा असेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले राज्यात गेल्या दीड महिन्यात जे सत्तांतर नाट्य घडले आणि जे राजकीय ताण-तणाव अनुभवाला आले त्यावर भाष्य करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ” बंड करताना जर थोडाही राजकीय धोका झाला असता तर नक्कीच शहीद होण्याची भीती होती मात्र सुदैवाने तसे घडले नाही सर्व आमदारांनी एक दिलाने एकजुटीने साथ दिली त्यामुळेच आज नवीन सरकार अस्तित्वात आले आहे.

तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी तापोळ्यात येताच पद्मावती देवीचे दर्शन घेतले देवीच्या दर्शनानंतर त्यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले मुंबई माझी कर्मभूमी असली तरी सातारा माझी जन्मभूमी आहे येथील लोकांनी केलेले स्वागत हे आनंददायीच असते हे शिवसेना भाजप युतीचे सरकार आहे त्यामुळे आम्ही हे सरकार पुढे नेत असून जनतेच्या अपेक्षाही आमच्याकडून वाढल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!