
धुळदेव येथील श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयात दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या श्रुती सरगर हिचा मान्यवरांनी घरी जाऊन विशेष सत्कार केला.
स्थैर्य, धुळदेव, दि. १४ जुलै : धुळदेव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयात दहावीच्या (एस.एस.सी.) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या श्रुती सरगर हिचा मान्यवरांनी तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. पुष्पगुच्छ व मिठाई देऊन तिच्या या उल्लेखनीय यशाचे कौतुक करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी श्रुतीचे माजी शिक्षक बाबासाहेब जगताप, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल निकाळजे, प्रगत शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद जगताप उपस्थित होते. सर्वांनी तिच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचे आणि अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले.
जिद्द आणि कष्टाचा सन्मान
श्रुतीने ग्रामीण भागातून शिक्षण घेत गुणवत्तापूर्ण यश मिळवले आहे. आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला असल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी तिच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या तिच्या आई-वडिलांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
उच्च शिक्षणासाठी साताऱ्यात प्रवेश
पुढील उच्च शिक्षणासाठी श्रुतीने सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल परिसरातून श्रुतीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
