दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आ. श्रीमंत रामराजे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ७ एप्रिल २०२४ | फलटण |
जिल्ह्यातील तसेच फलटण तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे गुढीपाडवा आणि माझा वाढदिवस आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करता, तथापि पाऊसमान कमी झाल्याने यावर्षी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. विहिरी, ओढे, नाले, तलाव कोरडे पडले असल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे.

वाढदिवस म्हणजे सर्वांना भेटण्याचा, एकमेकांची सुख-दुःखे जाणून घेण्याचा, जुन्या आठवणींना उजाळा देत नवा मार्ग शोधण्याचा, गुजगोष्टी करण्याचा दिवस. ते टाळता येणार नसल्याने मंगळवार, दि. ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडवा आणि वाढदिवस यानिमित्ताने आपण सकाळी १० ते १२ या वेळेत अनंत मंगल कार्यालय, कोळकी (फलटण) येथे फक्त भेटू, पण येताना हार, गुच्छ, फुले याऐवजी शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, पेन आणावेत, अशी माझी अपेक्षा आहे, असेही त्यांनी पत्रकात कार्यकर्त्यांना व जनतेला आवाहन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!