साताऱ्यात वारे अन् विजांच्या कडकडाटात बरसला वळीव, वीजपुरवठा खंडित


दैनिक स्थैर्य । दि. ०७ एप्रिल २०२३ । सातारा । सातारा शहरात शुक्रवारी दुपारी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटात वळवाचा पाऊस झाला. यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. तर पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने विक्रेत्यांची धांदल उडाली. दरम्यान, जिल्ह्यातीलही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.

सातारा शहरातील वातावरणात दोन दिवसांपासून बदल झाला होता. पारा वाढल्याने उकाडाही जाणवत होता. त्यातच ढगाळ वातावरणही तयार होत होते. शुक्रवारी सकाळपासून तर वातावरण पावसाळी झाले होते. दुपारी आभाळ भरून आले तसेच वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चारच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. काही क्षणातच वळवाचा पाऊस जोरदार पडू लागला. त्यामुळे डोंगर उतारावरील भागातील पाणी रस्त्यावरून वाहू लागले. परिणामी विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली.

याचदरम्यान, जोरदार वारे वाहू लागले होते. तसेच विजांचा कडकडाटही सुरू झाला होता. त्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज कंपनी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. तर वळवाच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळे सातारकरांची काही काळासाठी का असेना उकाड्यापासून सुटका झाली.

दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागांतही शुक्रवारी वळवाचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, अजूनही अनेक पिकांची मळणी सुरू आहे. त्यामुळे नुकसानाची भीती आहे. तर या पावसाचा आंब्यासह फळबागांना फटका बसू शकतो.


Back to top button
Don`t copy text!