दैनिक स्थैर्य | दि. १८ मे २०२४ | पुणे |
राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम आहे, तर सातारा जिल्ह्यातही वादळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वार्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वार्यांची स्थिती असून, त्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
भारतीय हवामान खात्याने शनिवारी आणि रविवारी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जळगाव जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय सोलापूर, सांगली, जालना, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये शनिवार आणि रविवार दोन दिवस तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपीट देखील होऊ शकते. या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मान्सून १९ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून १९ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ३१ मे च्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यापुढील वातावरण पोषक असेल तर मान्सून ७ ते १० जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे.