ज्ञानाधिष्ठीत समाज निर्मितीसाठी जिल्ह्यात ‘वाचक वाढवा’ मोहिमेस सुरुवात


दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । सातारा । ग्रंथ वाचनातून ज्ञानाची अनुभूती घेण्यासाठी ‘वाचक वा़ढवा’ मोहिम स्तुत्य आहे. यात नागरिकांनी उस्फुर्तपणे ग्रंथालयांचे सभासद होण्यासाठी पुढाकार घ्यावा. ज्ञानसंपन्न राष्ट्र उभारणीस ही मोहिम निश्चितच उपयुक्त आहे, असे प्रतिपादन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सातारा या शासकीय ग्रंथालयात दि.9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव’ विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यामध्ये 1) ‘ग्रंथप्रदर्शन’ 2) ‘हर घर तिरंगा’ फलक अनावरण 3) ‘स्वांतत्र्य सैनिक चरित्र कोश’ (खंड-3) ग्रंथाचे लोकार्पण व 4) ‘वाचक वाढवा’ या मोहिमेची उध्दघोषणा इत्यादी कार्यक्रम संपन्न होत आहेत. या कार्यक्रमास नितीन उबाळे, सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सातारा हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

देशातील जनतेचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ व ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे. भारतीय स्वांतत्र्याच्या 75 वर्षात सुजाण नागरिक घडविण्यात व ज्ञानसंपन्न राष्ट्र उभारणीत ग्रंथालयांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे.

स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ व ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची थोडक्यात माहिती दिली. भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या क्रांतीकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच ‘स्वांतत्र्य सैनिक चरित्र कोश’ (खंड-3) या ग्रंथाच्या दोन प्रती शासकीय ग्रंथालयात संदर्भासाठी उपलब्ध असल्याची माहिती देवून या ग्रंथाचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी व अभ्यासकांनी घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी केले.

प्रत्येक घरात राष्ट्राध्वज, राष्ट्राच्या जडणघडणीसाठी; सार्वजनिक ग्रंथालये सज्ज, ज्ञानसंपन्न राष्ट्र उभारणीसाठी या घोषणेतील सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व सांगत या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तांत्रिक सहाय्यक संजय ढेरे यांनी केले. शेवटी ग्रंथालय निरीक्षक किरण पाटील यांनी आभार व्यक्त केले. ग्रंथालयाचे वाचक, सभासद व परिसरातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!