मुधोजी महाविद्यालयामध्ये प्रा. डॉ. अनिल टिके यांनी शिवव्याख्यानाचा रचला इतिहास


दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली.

प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक इतिहास विभागाच्या प्राध्यापिका डॉ. मठपती मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे व्याख्याते प्रा. डॉ. अनिल टिके सर यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने व्याख्यान देताना शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्रातील सुलतानी सत्तांच्या अत्याचाराची माहिती दिली.

बिकट परिस्थितीमध्ये स्वराज्य उभे करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती देताना डॉ. टिके सर म्हणाले की, महाराजांच्या विचारांचे पालन करणे, हीच महाराजांची खरी जयंती असेल. पुढे त्यांनी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील अनेक घटनांचा आढावा देत महाराजांचे चातुर्य, निर्णयक्षमता, नियोजन, मावळयांवरील श्रद्धा आणि विश्वास, निडरता, स्त्रियांचा आदर, गनिमी युद्धनीती या आणि अशा अनेक गुणांचे वर्णन महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांचे उदाहरण देवून केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना सांगितले की, शिवजयंती दिवशी शिवव्याख्यान हे महाविद्यालयाच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. त्यांनी आपल्या व्याख्यानातून युवकांनी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेवून आई – वडिलांचे स्वप्न सत्कार्यातून पूर्ण करण्याचे आवाहन केले आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. जी. दीक्षित सर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. वेदपाठक सर आणि ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

इतिहास विभागाचे प्रा. विशाल मोरे यांनी आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. योगिता मठपती यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!