रायगडी राजधानी साताऱ्याचा सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । सातारा । ३४९ व्या शिवराज्याभिषेक दिनी दुर्गदुर्गेश्वर रायगडावर शिवभक्तीला उदंड भरते आले होते. स्वराज्याची जिवंत राजधानी सातारा येथून आलेल्या मंगल कलशाचे रायगडावर जल्लोषांत स्वागत होऊन मान्यवरांच्या हस्ते त्या मंगल कलशाने राजाभिषेक करण्यात आला. त्या आधी कलशाच्या निघालेल्या शोभायात्रेवर हजारो शिवभक्तांनी फुलांचा वर्षाव केला. दरम्यान, सातारा समितीच्यावतीने पुढील 350 व्या राजाभिषेक दिनी देशाच्या पंतप्रधानांना निमंत्रित करण्याचा संकल्प राजसदरेवर सोडण्यात आला. राज्यातील बहुतांश संस्था, समिती, मंडळांनी त्याला दुजोरा दिला.

रायगडावरील परंपरेप्रमाणे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवर महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या सुमारे चाळीस हजार शिवभतांच्या महापुराने सारा रायगड दुमदुमून गेला होता. रायगडाची परंपरा वृद्धींगत करण्यासाठी सातारच्या शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीने ‘राजधानी ते राजधानी’ या मोहिमेची आखणी करून राजाभिषेकात विद्यमान साताऱयाचे महत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा या मोहिमेच्या दशकपुर्ती मोहिमेला कित्येक पटीने महत्व देऊन पारंपारिक समितीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, सातारा समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड, अध्यक्ष दीपक प्रभावळकर तसेच देशभरातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याभिषेक केला. कलशाचे राजसदरेवर महंत प्रकाशस्वामी जंगम व श्री धारेश्वर महाराज यांनी विधिवत पूजन केले भल्या पहाटेपासून भारावलेल्या शिवमय वातावरणांत शिवभक्तीला उधाण आले होते.

असा झाला कलशाचा प्रवास
राजाभिषेक होणार कलशामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर येथील दहा नद्यांचे जल एकत्रीत करून कलशाचे राजधानी साताऱयाच्या शिवतिर्थावर मान्यवरांच्या हस्ते पूजन करून तो रायगडी नेण्यात आला. शिवरायांच्या समाधीचे दर्शन करून श्रीजगदिश्वर मंदिर व शिरकाई मंदिरात पूजन झाल्यावर होळीच्या माळावरील मुर्तीसमोर हा कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर होळीचा माळ ते राजसदरेपर्यंत याची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी देशभरातून आलेल्या शिवभक्तांनी पुष्पवृष्टीकरत मंगल कलशाचे स्वागत केले. तेथे भव्य अशा सोहळय़ाकरता राज्यभरातून शिवभक्तांच्या वाजतगाजत मिरवणूका आल्या होत्या.

त्या मिरवणूकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व शस्त्रs, ढोलताशे अशी पारंपारिक वाद्ये, भगवे ध्वज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाद्यांनी वातावरण शिवमय होवून गेले होते. महंत व पुरोहितांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवराज्यभिषेक सोहळा सुरु झाला. त्याच दरम्यान, सप्तनद्यांच्या जलाद्वारे अभिषेक करून झाल्यावर राजधानी सातारहून आलेल्या मंगल कलशाने जयघोषात मान्यवरांसह प्रमुख अतिथिंच्या हस्ते राज्याभिषेक करण्यात आला.

पंतप्रधानांना निमंत्रित करण्याचा संकल्प
पुढील वर्ष हे राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष असल्याने यावेळी पंतप्रधानांना निमंत्रित करण्याचा संकल्प साताऱयाच्या शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने सोडण्यात आला. याला हजारो शिवभक्तांसह शेकडो संस्थांनी सहमती दर्शवून पुढील वर्षी न भविष्यती असा प्रचंड कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.

साताऱयातून आलेल्या मंगल कलशासोबत सुदाम गायकवाड, दीपक प्रभावळकर, महेश पाटील, शरद तोडकर, रणजित काळे, बाबासाहेब भंडारी, प्रवीण धुमाळ, रणजित काळे, गणेश विभूते, अमोल शेंडे राजेंद्र वारागडे, विशाल कदम, किशोर बाबर, संतोष लोहार, शंकर कुंभार, खैरमोडे, अनिस चाऊस, अनिल बोधे, विवेक मोरे, निलेश फुटाणे, नवनाथ दुसाळकर, बलराम गौडा आदी शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!