महाशिवरात्र’ व्रताचे महत्त्व

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । शिव ही सहज प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे शिवाचे भक्त पृथ्वीतलावर मोठ्या प्रमाणात आहेत. महाशिवरात्र हे शिवाचे व्रत असून या व्रताचे महत्त्व, व्रत करण्याची पद्धत आणि महाशिवरात्र व्रताचा विधी यांविषयीची शास्त्रीय माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया.
तिथी – महाशिवरात्र हे व्रत माघ वद्य चतुर्दशी या तिथीला करतात.
देवता – महाशिवरात्र हे शिवाचे व्रत आहे.
महत्त्व:  महाशिवरात्र या दिवशी शिवतत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. शिवतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी महाशिवरात्रीला शिवाची भावपूर्णरित्या पूजाअर्चा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.
प्रकार :  काम्य आणि नैमित्तिक.
महाशिवरात्र व्रत करण्याची पद्धत :  उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत.
महाशिवरात्र व्रताचा विधी :  माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचारे पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.
यामपूजा :  शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.’
शिवाने विश्रांती घेण्याची वेळ म्हणजे `महाशिवरात्र’
भगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती खूप कमी असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी अन् देवता यांच्यामध्ये एक वर्षाचे अंतर आहे.
 महाशिवरात्रीला उपासना केल्याने होणारा लाभ
भगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्र’ असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र याप्रमाणे आहे. `शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेमध्ये जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्यावेळी शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा अनिष्ट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीतजास्त शिवतत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिवतत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे अनिष्ट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम आपल्याला म्हणावा तितका जाणवत नाही.’
‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक करा !
कलियुगात नामस्मरण ही साधना सांगितली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी १ सहस्र पट कार्यरत असणार्‍या शिवतत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक करावा. या वेळी ‘आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत’, असा भाव ठेवावा.भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप, रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच. भगवंताच्या नामाचे उच्चारण करतांना तसेच ते नाम ऐकतांना हे लक्षात घेऊन त्या प्रमाणे नामजप करावा. भगवंताच्या नामाचे उच्चारण करतांना तसेच ते नाम ऐकतांना देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य प्रकारे करून नामजप करावा.
देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे. नामाचा संस्कार मनावर रूजेपर्यंत तो मोठ्याने म्हणून करणे लाभकारी आहे.भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप, रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच.भगवंताच्या नामाचे उच्चारण करतांना तसेच ते नाम ऐकतांना देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे याप्रमाणे नामजप करताना तो एकाग्रतेने करावा.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाने ज्ञान देणे
`महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सर्व जिवांना आवर्जून मार्गदर्शन करतो. त्यामुळे अनेक जीव त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्या दिवशी शिवलोकात उपस्थित असतात.’
या लेखात सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीमागील शास्त्र समजून आणि त्यानुसार कृती करून, शिवभक्तांनी अधिकाधिक शिवतत्त्वाचा लाभ करून घ्यावा, ही भगवान शिवाच्या प्रार्थना !
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘शिव’
संकलक : श्री. हिरालाल तिवारी संपर्क क्र. : ९९७५५९२८५९

Back to top button
Don`t copy text!