स्थैर्य, सातारा, दि.९ : उसाला पहिली उचल एफआरपी एकरकमी मिळालीच पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आणि किसान मंचच्या वतीने शुक्रवारी (ता. 13) सकाळी 11 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी दिली.
अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे. निसर्गाच्या अवकृपेने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी शासनाने याबाबत तातडीने हालचाली करणे गरजेचे आहे. पुढील हंगामासाठी बी बियाणे, खते, औषधे खरेदी करता यावीत व मशागतीसाठी पावसाने झालेल्या नुकसानी देणे गरजेचे आहे, तसेच विविध संकटांवर मात करत शेतकरी शेती पिकवत आहेत.
आता गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांच गळचेपी करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. या गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल एकरकमी दिली पाहिजे. या मागण्यांकडे शासनाने तातडीने पूर्ण कराव्यात, यासाठी शुक्रवारी आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन कार्याध्यक्ष श्री. गोडसे, जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा पौर्णिमा गायकवाड, किसान मंच पश्चिम महाराष्ट्रच्या महिला आघाडी प्रमुख संगीता मोडक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.