दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
साखर कारखान्यांमध्ये सत्तेचे राजकारण आले व चुकीच्या नेतृत्वाच्या हातात कारखाना गेल्यास काय होते, हे आपण मागील चार वर्षांपूर्वी अनुभवले आहे. साखर कारखाने हे व्यवसाय म्हणूनच चालवले पाहिजेत. भविष्यात या चुका पुन्हा करू नका. आता श्रीदत्त इंडियाच्या रूपाने अतिशय प्रामाणिक माणसे आपल्या भागात आली आहेत. त्यांना कामगार व बागायतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुका साखर कामगार युनियन आयोजित कृतज्ञता सत्कार सोहळा व कारखान्यातील कामगारांना ग्रेडेशन वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.
या कृतज्ञता सोहळ्यास श्री दत्त इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रीती रूपारेल, संचालक जितेंद्र धारू, महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, महानंदाचे संचालक डी. के. पवार, पंचायत समिती फलटणचे माजी सभापती शंकरराव माडकर, रेश्माताई भोसले, माजी सदस्य सागर कांबळे, संजय भोसले, श्रीरामचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, संचालक रमेश बोंद्रे, फलटण तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष सतीश माने, होळ सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भोसले, व्हाईस चेअरमन चंद्रकांत मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले की, फलटण तालुक्यातील ९० टक्के जमीन ओलिताखाली आली आहे. या भागात उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या क्षमतेच्या कारखान्याची आवश्यकता होती, ती श्रीदत्त इंडियाच्या रूपाने पूर्ण झाली आहे. प्रीती रूपारेल यांनी एनसीएलटीच्या कक्षेबाहेर जाऊन बागायतदार, कामगारांची थकीत देणी, ग्रेडेशन, वेतन वाढ, मागील फरक या गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करायची असल्यास ती प्रीती रूपारेल यांची करायला हवी. यावर्षी आपल्या भागात पाऊस न पडल्याने उसाची वाढ खुंटल्याने यावर्षीच्या गळीत हंगामासमोर फार मोठे आव्हान उभे राहणार आहे. शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यांनी दिलेल्या तीन हजारांहून अधिक भावामुळे आपल्याही उसाला रास्त भाव मिळाला पाहिजे, ही प्रत्येकाची भावना असून ती योग्य आहे. मात्र, अवाजवी मागणी करणे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
तात्यासाहेब काळे म्हणाले, साखर कामगारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ हे कायम कामगारांच्या पाठीमागे ठाम उभे राहिले आहे. त्रिपक्षीय समितीची स्थापना स्थापना करायची मागणी करणे, कामगारांची वेतनवाढ, सेवासुविधा मिळवून देणे यासाठी साखर कामगार युनियन काम करत असते. मागील काळात श्रीराम अडचणीत असताना श्रीमंत रामराजेंच्या माध्यमातून तोही चांगल्या प्रकारे मार्गे लागला आहे. आता श्री दत्त इंडिया सुद्धा चांगल्याप्रकारे मार्गी लागला आहे. वेतनवाढ देत असताना या गोष्टीला अनेक कारखान्यांचा विरोध होता. यामध्ये साखर कारखाने अडचणीत आहेत, एवढा पगार द्यायची गरज नाही, मात्र शरद पवार यांनी यामध्ये सुवर्णमध्य काढून कामगारांना १२ टक्के वेतन मिळवून दिली. न्यू फलटण शुगर कारखाना एनसीएलटीच्या माध्यमातून घेताना संचालिका प्रीती रूपारेल व जितेंद्र धारू यांच्याकडे ज्या ज्या मागण्या करण्यात आल्या, त्यांची पूर्तता त्यांनी केली. कामगारांचा राहिलेला भविष्यनिर्वाह निधीचा प्रश्नही नक्कीच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रास्ताविक पोपट भोसले यांनी केले. राजेंद्र भोसले व राजेंद्र गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना कारखान्याच्या तीस वर्षातील स्थित्यंतराविषयी माहिती दिली.
यावेळी फलटण तालुका साखर कामगार युनियनचे गोरख भोसले, संजय जाधव, पै. संतोष भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, सुरेश भोसले, निवृत्ती भोसले, पै. महेश भोसले, एच. आर. विराज जोशी, ऋतुराज पाटील, सुरक्षा अधिकारी अजय कदम, कारखान्यातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी व साखरवाडीसह तालुक्यातील राष्ट्रवादी राजेगटाचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.