बळीराजा पेटून उठला तर सरकारला तोंड दाखवणे अवघड होईल : राजू शेट्टी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण दि.४ : राजधानी दिल्लीत सुरु असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन हे केवळ ठराविक राज्यांपुरते मर्यादित नसून त्या आंदोलनाला देशभरातील शेतकर्‍यांचा पाठींबा आहे. केंद्र सरकार शेतकर्‍यांची मुस्कटदाबी करत असून आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी आंदोलन विविध मार्गाने दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्यांचा तात्काळ विचार करावा. जर देशातील बळीराजा आणखीन पेटून उठला तर सरकारला तोंड दाखवणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. 

राजू शेट्टी हे फलटण येथे जुन्या खटल्याच्या संदर्भात न्यायालयीन कामकाजासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, डॉ.रवींद्र घाडगे, संजय चिटणीस, प्रमोद गाडे, दादा जाधव आदी उपस्थित होते. 

राजू शेट्टी पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातील शेकर्‍यांनी आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन देशातील शेतकर्‍यांचे आंदोलन आहे. या शेतकर्‍यांच्या पाठींब्यासाठी आम्हीपण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असून स्वाभीमानी शेतकरी संघटनादेखील कृषी कायद्याविरोधात आवाज उठवत राहणार आहे. तर आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला तर त्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असे ही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील वाढीव वीज बिलांबाबत शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला अपेक्षित मदत केलेली नाही. या काळात आधीच जनतेचे प्रचंड हाल झालेले असताना सरकारने भरमसाठी वीज बीले लोकांच्या माथी मारलेली आहेत. ही वीज बिले कमी करण्यासाठी जनतेने आवाज उठवला तरी सरकार याकडे लक्ष देत नाही. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिटपर्यंत वीज माफ करण्याचा केलेला दावा देखील फसवा ठरला. त्यांना अधिकार नव्हता तर त्यांनी कशासाठी वल्गना केल्या असा सवाल करुन सरकारने ‘त्या’ तीन महिन्यातील संपूर्ण वीज बिले माफ करावीत. सरकारने याबाबात तात्काळ गांभीर्याने विचार न केल्यास ‘स्वाभीमानी’ या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला. 

साखर कारखान्यांच्या एकरकमी एफआरपीबद्दल शेट्टी यांना विचारले असता, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात साखर कारखान्यांनी एकरमकी एफआरपी शेतकर्‍यांच्या खात्यावर भरली आहे. सातारा जिल्ह्यात मात्र एक कारखाना वगळता अन्य कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. याबाबत 5 डिसेंबर रोजी होणार्‍या बैठकीत जर निर्णय झाला नाही तर सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील शेतकर्‍यांना एकत्रित करुन 2013 साली कराड येथे ज्या पद्धतीने मोठे आंदोलन केले होते त्याच आंदोलनाची पुनरावृत्ती सातारा येथे करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगीतले.

खटल्याच्या निमित्ताने जुने मित्र आमने – सामने पण एकमेकांकडे दुर्लक्ष

दरम्यान, जुन्या खटल्याच्या निमित्ताने फलटण न्यायालयात राजू शेट्टी यांच्यासह स्वाभीमानी शेतकरी संघटनेतील एकेकाळचे त्यांचे जुने सहकारी मित्र, रयतक्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसमवेत हजर होते. मात्र राजकारणाच्या निमित्ताते गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये एकमेकांविषयी कमालीची कटुता आली असल्याने दोघांनीही आमने – सामने येवूनही एकमेकांकडे दुर्लक्ष करणेच पसंद केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!