आयडियल स्कूलच्या दहीहंडीत ग्रीन हाऊसची बाजी; पहिल्याच प्रयत्नात फोडली हंडी

आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या दहीहंडी महोत्सवात चार हाऊसच्या गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. ग्रीन हाऊसने विजेतेपद पटकावले.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने सजाई गार्डन येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त ‘दहीहंडी महोत्सव २०२६’ उत्साहात झाला. लक्ष्मी नगर व बिरदेव नगर या दोन्ही शाखांमधील ज्युनिअर केजी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह दहीहंडी स्पर्धेत सहभाग घेतला.

चार हाऊसमध्ये रंगली दहीहंडीची चुरस

बाळकृष्ण पूजन व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विविध गोविंदा गीतांवर नृत्य सादर केले, तर बालवर्गातील विद्यार्थ्यांनी बाळकृष्ण आणि राधाच्या वेशभूषेत सहभाग घेतला. नृत्यांचे दिग्दर्शन प्रशांत भोसले यांनी केले.

यानंतर रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो या चार हाऊसच्या गोविंदा पथकांनी दहीहंडीला सलामी दिली. चुरशीच्या स्पर्धेत ग्रीन हाऊसच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले.

शुभदा झणझणे यांचा गौरव

क्रीडा शिक्षिका शुभदा झणझणे यांना कराड येथे मिळालेल्या ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२६’बद्दल संस्थापिका वैशाली शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त झालेल्या उपक्रमातील विजेत्यांनाही बक्षिसे देण्यात आली. ‘बेस्ट टीचर’ म्हणून इयत्ता सहावीतील संस्कृती गवळी हिचा गौरव करण्यात आला.

शिपायाची जबाबदारी पार पाडल्याबद्दल इयत्ता सातवीतील आरव खलाटे, अमरदीप कांबळे, स्वरूप तेली, हर्षवर्धन मुळीक आणि इयत्ता आठवीतील तन्मय देवकर यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विश्वास, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्ती रुजविणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे वैशाली शिंदे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता जाधव यांनी केले. मैदान व्यवस्थापन शुभदा झणझणे, प्रवीण पवार, निखिल सर आणि चैतन्य सर यांनी पाहिले. यावेळी डायरेक्टर शिवराज भोईटे, कमिटी सदस्य श्रद्धा शहा यांच्यासह दोन्ही शाखांतील शिक्षक, कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!