
फलटणमधील आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रात्यक्षिके व मानवी मनोऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
स्थैर्य, फलटण, दि. 17 ऑगस्ट : फलटण येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन, मानवी मनोरे आणि विविध देशभक्तीपर प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
आयटीबीपी जवानाच्या हस्ते ध्वजारोहण
इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाचे (ITBP) जवान महेश निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे, शिवराज भोईटे, मयूर भोईटे, मंदार पाटसकर आणि श्रद्धा शहा उपस्थित होते. उपमुख्याध्यापिका सोफिया तांबोळी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थी विश्वजीत लाड याने आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांची लक्षवेधी प्रात्यक्षिके
ध्वजारोहणानंतर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात शिस्तबद्ध संचलन केले. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर, तर लक्ष्मीनगर शाखेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायती सादर केल्या. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले. आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले साहसी मानवी मनोरे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
मान्यवरांचे मार्गदर्शन आणि नियोजन
पालक ॲड. रेश्मा पठाण यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम आणि जबाबदार नागरिकत्वाची प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले. प्रशांत भोसले, शुभदा झणझणे आणि सारिका यादव यांनी विद्यार्थ्यांना या प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण दिले. निखिल कुदळे, चैतन्य शिंदे आणि प्रवीण पवार यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता जाधव यांनी केले.
