
दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२६ | म्हसवड |
सातारा जिल्हा बँकेच्या गेल्या निवडणुकीत मी विरोधकांना धक्का देत माण सोसायटी मतदारसंघातून संचालक म्हणून निवडून आलो होतो. सध्या जि. बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास सेवा सोसायट्यांचे ठराव चालू आहेत. या ठरावाबाबत काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असले तरी आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेत संचालक म्हणून आपणच जाणार असल्याचा विश्वास सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शेखर गोरे म्हणाले की, गेल्या जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. सर्वच विरोधक नेतेमंडळींनी एकत्र येत फक्त शेखर गोरेला संचालक होऊ द्यायचे नाही, असा अजेंडा घेतला होता. आपल्याला थांबवण्यासाठी सर्व हेवेदावे बाजूला ठेवत राजकीय तह करत आपल्या विरोधी उमेदवारास मदत केली होती. तरीही आपण सर्व विरोधकांना चपराक देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत जिल्हा बँकेत संचालक म्हणून प्रवेश केला.
गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळाली. या संधीमुळे शेतकरी, सभासदांचे विविध प्रश्न सोडवता आले. सध्या जिल्हा बँकेची निवडणूक लांब असली तरी मतदानासाठी लागणारे गावोगावी सोसायट्यांचे ठराव करण्यात येत आहेत. यासाठी काहीजण साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करत आहेत. परंतु कोणी कितीही ताकद लावली असली तरी आपली भूमिका आत्तापासूनच स्पष्ट असून, निवडणूक कितीही कठीण असो, राजकीय आव्हाने कितीही असोत; ठरावांचे गणित जुळवत जिल्हा बँकेत पुन्हा संचालक म्हणून जाण्याचा आपला निर्धार कायम असल्याचेही शेखर गोरे यांनी यावेळी सांगितले.
