दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
समाजातील प्रत्येक महिलेचा सन्मान करणे, विधवा मातांना प्रत्येक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करणे, चांगल्या संस्काराचा आई जगदंबेकडे जोगवा मागणे, हेच खरे नवरात्र होय, असे परखड विचार प्रबोधनकार, कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी व्यक्त केले.
तडवळे (फलटण) येथील श्री लक्ष्मीमाता नवतरुण मंडळ आयोजित व्याख्यानमालेत ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या विषयावर कोकरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अशोक खराडे होते. सिराज शेख, गणेश गवळी, अमित जाधव, संजय मदने, ज्ञानदेव खराडे, सूरज चव्हाण, विक्रम आवटे, नवनाथ मदने उपस्थित होते.
प्रा. कोकरे म्हणाले ‘शारदीय नवरात्रौत्सव बीभत्स न होता सांस्कृतिक दर्जा जपणारा असावा. डी.जे., गरबा, हिडीस नाचगाणी यातून बाहेर पडल्याशिवाय लक्ष्मीमातेचा वरदहस्त लाभणार नाही.
तडवळे पंचक्रोशीतील भाविक भक्त अस्सल बोलीभाषेतील व्याख्यानाने भारावून गेले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक समीर जाधव याने केले. सूत्रसंचलान ज्ञानेश्वर जाधव याने केले, तर आभार सोमनाथ मदने यांनी मानले.