परशुराम पुरस्काराने केलेला सन्मान हा लेख मोलाचा : शिक्षणतज्ञ संजय इनामदार


दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२२ । फलटण । माझ्या व्यवसायानिमित्त देश विदेशात अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग येतो तेथे माझे सन्मान झाले परंतू आज फलटण ब्राह्मण केंद्रातर्फे जो परशुराम पुरस्कार व मान मिळाला तो कायम स्मरणात राहील तो लाख मोलाचा आहे, असे मत पुणे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्योजक व शिक्षणतज्ञ संजय इनामदार यांनी व्यक्त केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, केंद्र फलटण यांच्यातर्फे महाराजा मंगल कार्यालय येथे २०२२ चा परशुराम पुरस्कार संजय इनामदार यांना मोठ्या दिमाखात प्रदान करण्यात आला. यावेळी नाशिक केंद्राचे कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, कार्यवाह सुभाष सबनीस, पुणे येथील उद्योगपती शारंग नातू तसेच फलटण केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे दीपप्रज्वलन व जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय परशुराम यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. अनिरुध्द रानडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन देताना सांगितले की, संजय इनामदार उद्योजक तर आहेतच त्याबरोबर नवीन उद्योजक तयार करण्याचे काम करतात. MIT, USA मधून मास्टर ऑफ सायन्स झाले असून जग प्रसिध्द हॉवर्ड युनिव्हर्सिटी मधून एम.बी.ए. पूर्ण केले आहे. अमेरीकेत मानद प्राध्यापक म्हणून ते कार्य करतात. त्यांनी शैक्षणिक कार्यात मोलाचे कार्य केले आहे असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी फलटण केंद्र प्रमुख विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत करुन मागील दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावाने कोणतेही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले नाहीत असे सांगून केंद्रातर्फे वर्षभर राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमाचा आढावा घेतला. नाशिक केंद्राचे उदयकुमार मुंगी यांनी सांगितले की, सध्याचा काळ तरुण पिढीला अत्यंत आव्हानात्मक ठरत असून त्यांना आदर्श निर्माण करण्याचे काम जेष्ठ नागरिकांवर आहे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आहे असे सांगितले. उद्योगपती शंतनू नातू यांनी सांगितले की, आज कोणताही व्यवसाय करताना आव्हाने व अडचणी आहेत यावर मात करुन जो जिद्दीने कार्य करतो तोच यशस्वी होतो असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधुरी दाणी यांनी केले. अन्य पाहुण्यांची ओळख अ‍ॅड.विजय कुलकर्णी व नंदकुमार केसकर यांनी केली आभार वैभव विष्णूप्रद यांनी मानले. या कार्यक्रमास नीरा, लोणंद, भादे येथील केंद्रप्रमुख, पदाधिकारी, तसेच फलटण परिसरातील निमंत्रक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!