कुरकुरणार्‍या खाटेवरचा ‘हनिमून’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


मध्यंतरी गायब झालेले ‘ज्येष्ठ पत्रकार’ निखील वागळे महिनाभराच्या सुट्टीनंतर पुन्हा अवतरले; तेव्हा त्यांनी एक धक्कादायक खुलासा केलेला होता. त्यांच्या मते त्यांचा हनिमून चालला होता आणि अचानक तो हनिमुन सोडून ते महिनाभराच्या सुट्टीवर गेल्याचे त्यांनीच कथन केले. त्यांनी त्यासाठी D-Tox असा इंग्रजी शब्द वापरला होता. पण त्याचा बहुतांश लोकांना अंदाज आला नाही, किंवा अर्थ कळला नाही. आता हनिमून अर्धवट सोडण्यामागचा गौप्यस्फ़ोट ‘सामना’ने केला आहे. मंगळवारचा सामनाचा अग्रलेख किंवा त्याचे शीर्षक निखीलच्या तक्रारीचे कारण असावे. ते शीर्षक आहे, ‘खाट का कुरकुरतेय?’ त्याचीच चिंता वाटल्याने वागळे हनिमून सोडून रजेवर गेले असावे काय? ‘सामना’चा अग्रलेख वागळ्यांना आश्वस्त करण्यासाठीच लिहीला आहे काय? खाट जुनी आहे आणि कितीही कुरकुरली तरी मोडणार नाही. तेव्हा निश्चींत मनाने हनिमून चालू ठेवा, असे सांगण्यासाठीच हा अग्रलेख लिहीलेला असेल, तर तो महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांना झोंबण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांनीच माध्यमांच्या समोर येऊन अग्रलेख अर्धवट अपुर्‍या माहितीवर आधारीत असल्याची तक्रार कशाला करावी? उलट सामनाच्या सुरात सुर मिसळून खाट जुनी नाही व कुरकुरणारी नाही. अगदी भक्कम छप्परी पलंग असल्याचे सांगून टाकायला हवे होते ना? मग वागळ्यांना निश्चींत मनाने आणखी चार वर्षे हनिमून चालवता आला असता. पण सगळाच विचीत्र प्रकार आहे. वागळे हनिमून सोडून पळतात, सामना खाटेची चिंता नको म्हणून आश्वासन देतो आणि बिचारे थोरात खाट कुरकुरत नसल्याचेही सांगतात. मग हा तिहेरी हनिमून मालिका म्हणून बघणार्‍यांनी काय बोध घ्यावा? ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ असा प्रश्न सामान्य प्रेक्षकांना सतावणारच ना? त्या ‘रिश्त्यातले पावित्र्य’ सांगताना आत्महत्या होताना बघितलेला प्रेक्षक अधिकच गडबडलेला आहे ना?

असो मुद्दा इतकाच, की शब्द योजताना खुप जपून वापरावे, याचे भान नसलेल्यांचीच एकूण पत्रकारितेत मांदियाळी झालेली असल्याने शब्दांचे बुडबुडे उडवले जाण्याला पर्याय नाही. मग त्यांचे राजकीय स्फ़ोट होणेही अपरिहार्यच ना? तीन पक्षांची आघाडी झाली आहे आणि त्यातल्या कुरबुरीविषयी सामना अग्रलेख लिहीतो आहे. त्यात आपल्या अब्रुची तरी जाणिव असायला हवी ना? आज सत्तेतला एक भागिदार कुरबुरी करतोय, तर जुनी खाट कुरकुरतेय अशा शब्दात त्या मित्रपक्षाची हेटाळणी करताना शिवसेना स्वत:च साडेचार वर्षे कशाला कुरकुरत होती, त्याचाही खुलासा करून टाकायचा ना? कॉग्रेसची खाट जुनी म्हणून कुरकुरत असेल, तर भाजपा सोबत साडेचार वर्षांची सत्तेतील शय्यासोबत करताना शिवसेना कशाला कुरकुरत होती? की तेव्हा शिवसेनाही जुनी खाट होती? की तेव्हा नवी खाट असूनही अधिक कुरकुरत होती. की तेव्हा नव्या खाटेवर हनिमून करणारे अधिक सुदृढ वरवधू होते? सामनाला नेमके काय म्हणायचे आहे? आपल्या सहकारी मित्र पक्षाविषयी कोणत्या भाषेत बोलावे किंवा किती बोलावे, याचेही काही निकष व मर्यादा असतात ना? की त्याबाबतीत एकट्या शिवसेनेला सवलती मिळालेल्या आहेत? कॉग्रेस जुना पक्ष आहे आणि त्याची कुरकुर वार्धक्याचे लक्षण ठरवायचे आहे काय? त्याकडे दुर्लक्ष करायचे असते असेच त्यातून सुचवले जात आहे का? की शिवसेना आपल्याच कुरकुरीच्या अनुभवाचे बोल कॉग्रेसल ऐकवित आहे? फ़डणवीस सरकारमध्ये बाकीची शिवसेना गप्प होती आणि एकटा सामनाच अखंड कुरकुरत होता. सन्मानाने वागवले नाही तर राजिनामे देऊन सत्तेला लाथ मारू; अशा धमक्या ‘सामना’ देत राहिला आणि सेनेच्याच तात्कालीन मंत्र्यांनीही त्या कधी गंभीरपणे घेतल्या नाहीत. अगदी खिशातले राजिनामे भिजून गेले तरी हे मंत्री सत्तेत टिकून राहिले होते ना? त्यालाच कुरकुरणारी खाट म्हणतात ना?

आपल्या कुरकुरण्याने फ़डणवीस सरकार एकदाही चिंताक्रांत झाले नाही आणि त्याने आपला पुर्ण पाच वर्षाचा कार्यकाल पुरा केला; असेच ‘सामना’ला म्हणायचे नाही का? तो आशय लक्षात घेतला तर कॉग्रेसला त्यातून काय शिकवले जात आहे, ते समजू शकते. तुम्ही कुरकुरत रहा, कितीही कुरबुरी करा, तुमच्याकडे मुख्यमंत्री ढुंकूनही बघणार नाहीत. असल्या कुरकुरण्याने खाटही मोडत नसेल, तर सरकार कशाला मोडेल? एवढाच त्यातला आशय असावा काय? राष्ट्रवादी असो किंवा कॉग्रेस असो, त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने खुप मोठा त्याग केलेला आहे. आपल्या हक्काच्या सत्तापदांवर आणि मंत्रीपदांवर पाणी सोडून तुम्हाला अधिकचा हिस्सा दिला आहे. त्यापेक्षा अधिक काही देणे शक्य नाही, ही ताकिद मानायची की टवाळी समजावी? सभापतीपद कॉग्रेसलाच हवे म्हणून शिवसेनेने एक कॅबिनेट मंत्रीपद आपल्या कोट्यातून राष्ट्रवादीला दिले. हा तपशील नवा आहे. म्हणजेच खुप काही देऊन झाले आहे आणि यापेक्षा अधिक काही देता येणार नाही; असाच इशारा त्यातून दिलेला असावा काय? जेव्हा अशी भाषा येते, तेव्हा अलिकडले काही प्रसंग आठवतात. थोरातांच्याच जिल्ह्यातले माजी कॉग्रेसनेते यशवंतराव गडाख यांचा इशाराही आठवतो. सरकार नवेनवे असताना गडाख म्हणाले होते, उद्धवरावांची अधिक कोंडी करू नका, ते राजिनामा देऊन मोकळे होतील. म्हणजेच मुख्यमंत्र्यांचा राजिनामा पर्यायाने सरकारच खाली खेचू शकतो. तेव्हा खुप कुरकुरी कुरबुरी करू नका, असेच गडाख सांगत होते. त्यांचा आवाज थोरातांना ऐकू आलेला नसल्याने सामनाला अग्रलेखातून टाहो फ़ोडावा लागलेला असावा. किंबहूना त्यातून थोरातांना कॉग्रेसची औकात दाखवण्याचाही हेतू असू शकतो. त्यासाठीचे सुचक इशारेही लपून रहात नाहीत. ‘मुख्यमंत्र्यांनी बरेच काही कुरकुर न करता दिले’ ह्याचा अर्थ विशद करून सांगण्याची गरज आहे काय? आणखीनही अनेक इशारे त्यात दडलेले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम राहिल हे पथ्य शरद पवारांनीही पाळलेले आहे’ असे सामना म्हणतो, त्यातून थोरात वा अशोक चव्हाणांना नेमका बोध घेता आला पाहिजे. कुरकुरण्यापेक्षा मातोश्री गाठावी आणि आपले काही मागणे असेल ते पदरात पाडून घ्यावे. शरद पवारांनी कधी कुरबुर केली नाही. ते सकाळी राजभवनावर गेले आणि संध्याकाळी मातोश्रीवर गेले. त्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या बैठका घेतल्या नाहीत, किंवा त्याविषयी पत्रकारांशी संवाद साधला नाही. ‘खाटपे चर्चा’ करायचा उद्योग केला नाही. पवारांना जर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मागावी लागली नाही, तर थोरात चव्हाणांना वेळ मागूनच जाण्याचे कारण काय? पत्रकारांसमोर कुरकुरत बसण्याचे कारण काय? की जे काही एकूण सरकार बनलेले आहे, ते आपल्याला खाटेप्रमाणे वापरते आहे आणि आपसात इतर दोघांची मौजमजा चालू आहे असे थोरातांनाही वाटते आहे? अर्धवट माहिती म्हणजे काय? सामनाने अर्धवट माहितीवर अग्रलेख लिहीला असे थोरातांनी कशाला म्हटले आहे? नंतर पुर्ण माहिती घेऊनही सामनाने अग्रलेख लिहावा, असा तरी आग्रह कशासाठी आहे? पण मुळात अग्रलेख कशासाठी असा प्रश्न त्यांनी विचारलेला नाही. शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे आणि त्याचे स्वतंत्र मुखपत्र आहे. त्याने अन्य कुठल्या मित्रपक्षाची पत्रास ठेवण्याचे काही कारण नाही. कॉग्रेस तरी कुठे शिवसेनेची पत्रास ठेवते? शिवसेनेने विधानसभा निवडणूकीत सावरकरांना भारतरत्न देण्याविषयीची मागणी पुढे केली होती. पण संयुक्त सरकार स्थापन केल्यावर त्याच कॉग्रेसच्या ‘शिदोरी’ मुखपत्राने सावरकरांच्या निंदानालस्तीचा प्रदिर्घ लेख प्रसिद्ध केला होताच ना? सेनेने कधी कुरबुर केली? सामनाने त्यावर नाराजी दर्शवली होती का? मग जुन्या खाटेची कुरकुर हनिमूनला बाधा आणते; असे सामनाने म्हटल्यावर थोरात वा कॉग्रेसने असे नाराज होणे अनुचितच ना?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!