स्थैर्य, सातारा, दि.०५: हनी ट्रॅपप्रकरणी अटक केलेल्या संशयितांनी कोल्हापुरातील एका बड्या व्यावसायिकाला आणि बारामतीमधील तिघांना आपल्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले असल्याचे सातारा तालुका पोलिसांच्या चौकशीत समोर येत आहे. संबंधितांना विश्वासात घेऊन त्यांना तक्रार देण्यासाठी पोलिस प्रयत्न करणार आहेत.
या टोळीतील महिला सोशल मिडियावर ओळख वाढवत होती तर अन्य साथीदार सावज हेरून त्यास ब्लॅकमेल करून लुट करत होते. 2019 पासून या टोळीच्या मागावर असलेल्या पोलिसांनी अखेर या टोळीचा पर्दाफाश केला. टोळीतील काजल प्रदीप मुळेकर (वय 28, रा. चव्हाणवस्ती, थेऊर, ता. हवेली. जि. पुणे, सध्या रा. सिंदवणे रोड, उरळीकांचन, ता. जि. पुणे), अजिंक्य रावसाहेब नाळे (23), वैभव प्रकाश नाळे (28, रा. रावागज ता. बारामती, जि. पुणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
त्यानंतर या टोळीतील सदस्यांना न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे. चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिस कोठडीत या गुन्ह्यांची चौकशी करत असतानाच आणखी काहीजण या टोळीच्या हाती लागले असल्याचे पोलिसांना समजले. कोल्हापूर आणि बारामतीमधील व्यावसायिकांची नावे सांगितली आहेत. संबंधितांना विश्वासात घेऊन त्यांना तक्रार देण्यासाठी पोलिस प्रयत्न करणार आहेत.